विद्यार्थिनीला व्हिडीओ कॉल केला आणि... पालकांनी शिक्षकाला शोधून धु..धु..धुतले

दौंडमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील मळदमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीला व्हॉटसअपवरून कॉल केला होता. 

Advertisement
Read Time: 3 mins
दौंड:

देवा राखुंडे

कोलकात्यातील आर.जी.कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर रुग्णालयातच पाशवी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बदलापुरातील एका शालेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण देशात संतापाचा भडका उडाला आहे. या घटना ताज्या असताना दौंडमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील मळदमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीला व्हॉटसअपवरून कॉल केला होता. 

या शिक्षकाचे आडनाव धुमाळ असल्याचे कळाले आहे. तो ज्या शाळेत शिकवतो त्याच शाळेतील विद्यार्थिनीला त्याने व्हॉटसअप कॉल केला.  यानंतर त्याने व्हॉटसअप कॉलवर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून हादरलेल्या विद्यार्थिनीने सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पालकांनी इतरांच्या मदतीने शिक्षकाला शोधून काढला आणि त्याला आयुष्यभर लक्षात राहील असा चोपून काढला. या शिक्षकाविरोधात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिक्षकाला निलंबित करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. 

बदलापूरच्या नराधमाने केली होती 3 लग्ने, तिघीही सोडून गेल्या

बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपी अक्षय शिंदेबाबत देखील एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे. अवघ्या 24 वर्षांच्या अक्षयने तीन लग्न केली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून निघून गेल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे आहे. मात्र त्याचे आधीच तीन लग्न झाले होते. मात्र त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. बदलापूरमधील एका नामवंत शाळेत तो सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. याआधी एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 

Advertisement

आरोपीच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड

अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते, परंतु कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही.

आरोपीला पोलीस कोठडी

आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं. 

Advertisement

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.