अमजद खान, प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात वेगानं वाढणारी, मध्यवर्गीय विशेषत: मराठी माणसांचे राहण्याची शहरं अशी कल्याण आणि डोंबिवलीची सर्वत्र ओळख आहे. पण, गेल्या काही दिवसांमध्ये या शहरांमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीच्या कृत्यानं संपूर्ण कल्याण शहर काही दिवसांपूर्वी हादरलं होतं. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. त्यानंतर पोलिसांच्या तावडीतील आरोपी पळून गेल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये शनिवारी ( 18 जानेवारी 2025) घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण ?
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला कल्याण न्यायालयातून आधारवाडी कारागृहात नेत असताना पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. पळालेल्या आरोपीचे नाव संजू वाघेरी असे आहे. त्याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
संजू वाघोरीला चोरीच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केली होती. त्याला शनिवारी कल्याण कोर्टात पोलिसांनी हजर केले होते. त्याला न्यायालयीन कोठडी असल्याने पोलिस त्याला वाहनात बसून आधारवाडी कारागृहात नेत होते. पोलिसांचं वाहन कल्याणच्या निकी नगर चौकात आलं होतं त्यावेळी आरोपीने गाडीतून उडी घेऊन पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याला शहरात विविध ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. दोन तासाच्या पोलिसांच्या शोधा नंतर आरोपी संजू वाघेरी हा मिळून आला नाही.
( नक्की वाचा : Kalyan Crime : विशाल गवळीचा फास आणखी आवळला, 3 भावांवर पोलिसांची मोठी कारवाई )
सुरुवातीला हा आरोपी वर्टेक्स मैदानाच्या झाडाझुडपात लपला असल्याचा संशय होता. पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला शोधले. तो काही पोलिसांना मिळून आला नाही. आरोपी पळून गेल्याने त्याला घेऊन जाणारे पोलीस हवालदिल झाले आहेत. आरोपी पळून गेल्याची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून कल्याण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारले जात आहेत.