उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे थोरवे हे ऐन अधिवेशना वेळी अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे. या अभिनेत्रीने आपल्या जीवाला धोका असल्याचं ही म्हटलं आहे. या अभिनेत्रीने खालापूर इथं पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. शिवाय थोरवे यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे प्रकरण नक्की काय याची चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खालापूराच्या कांढरोली गावाजवळ हेमांगी राव यांची जमीन आहे. या जमीनीचा हा वाद आहे. ही जमीनीचा नवी मुंबई येथील बिल्डर दीपक वाधवा याच्या बरोबर व्यवहार झाला होता. मात्र हा व्यवहार पूर्ण होवू शकला नाही. त्या ठिकाणी आता हेमांगी राव आपल्या पतीसह नवा प्रोजेक्ट करत आहेत. मात्र या प्रोजेक्टला वाधवा यांच्या गुंडांकडून आडकाठी आणली जात आहे असा आरोप राव यांनी केला आहे.
ही जागा हडपण्याचा डाव वाधवा यांचा आहे. त्याला आमदार महेंद्र थोरवे यांची साथ आहे असा ही त्यांनी आरोप केला आहे. त्यात भर म्हणून खालापूर पोलीस देखील कोणतीच दखल घेत नाही, असं ही हेमांगी राव यांचे म्हणणे आहे. आपल्यासह कुटुंबातील पती व मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने मला न्याय द्यावा अशी मागणी हेमांगी राव यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी खालापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह नवी मुंबईतील बिल्डर दीपक वाधवा यांच्या विरोधात केली आहे. शिवाय या प्रकरणी त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे. ही जागा जुन्या मुंबई पुणे महामार्गा लगत आहेत. या जागेचा व्यवहार 11 कोटीला ठरला होता. मात्र तो पुर्ण झाला नाही असं राव सांगतात. मात्र आता अनेक वर्षानंतर वाधवा या जमीनीवर आपला हक्क सांगत आहे असं ही त्यांनी सांगितलं.
या प्रकरणात हेमांगी राव यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे थेट नाव घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. बिल्डर बरोबर मिळून जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप ही राव यांनी केला आहे. शिवाय त्यांनी पोलीसांच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ही तापण्याची शक्यता आहे. थोरवे हे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंच्या विरोधात बोलत आहेत. अशा वेळी या प्रकरणावरून थोरवे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.