
अलीकडच्या काळात धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकच्या वापरावरून वाक युद्ध रंगले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ध्वनिक्षेपक वापराबाबत नवीन नियमावली बनवली आहे. यात ध्वनीक्षेपक असावेत की नाही या दोन्ही बाजूने अनेकांनी मते मांडली होती. पण राज्यातलं असं एक गावा आहे ज्या गावात आता नाही तर 7 वर्षापूर्वीच भोंगे बंदी लागू करण्यात आली. विशेष म्हणजे हा निर्णय सर्व धर्मीयांनी एकमताने घेतला आहे. तो आजही कुठल्याही वादा शिवाय पाळला जात आहे. त्यामुळे या गावाचा भोंगेबंदीचा फॉर्म्यूला काय? याची चर्चा सगळीकडे होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
30 जानेवारी 2018 ही तारीख नांदेड जिल्ह्यातील बारड या गावासाठी अत्यंत महत्वाची ठरली. ही तारीख उजाडली त्या दिवशी सर्वजण लगबगीने ग्रामपंचायत कार्यालयाकडे निघाले होते. यात हिंदू- मुस्लिम- बौद्ध- जैन असे सर्व धर्माचे बारड गावातील रहिवाशी होते. ग्रामपंचायतला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा उपसरपंच राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली होती. सभेसाठीचा कोरम देखील पूर्ण झाला होता. कामकाज सुरु होताच गावातील वसंत लालमे यांनी गावातील सर्व धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याचा ठराव मांडला.
त्यांच्या ठरावाला किशोर देशमुख यांनी अनुमोदन दिले. या ठरावावर गावातील भिन्न समाजाच्या अनेकांनी मते मांडली. शेवटी हा ठराव एकमताने मंजूर झाला. ठराव मंजूर होताच गावातील सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले होते. हे सर्व सात वर्षापूर्वी घडलं. बारड हे गाव नांदेड मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असेल गाव आहे. सुमारे 15 हजार या गावची लोकसंख्य आहे. या भागातील शेती अत्यंत सुपीक शेती म्हणून ओळखली जाते. बागायती शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या गावात 8 हिंदू मंदिरे, 2 बुद्ध विहार आणि 1 मस्जिद आहे.
या सर्व धार्मिक स्थळांवर पूर्वी भोंगे होते. गावात असलेल्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यातून जानेवारी 2018 पूर्वी स्पर्धा लागल्याप्रमाणे आवाज यायचे. याबाबत काहीजण आवाज कमी करा, अशी विनंती तिथल्या तिथे करायचे. तर काहीजण वैतागून ग्रामपंचायतीकडे तक्रार करत होते. यातून छोट्या मोठ्या कुरबुरी पण होत होत्या. एकाला समजून सांगितले की दुसरा नाराज व्हायचा, अशी स्थिती अनेकदा निर्माण व्हायची. त्यातूनच तंटे नको शांतता असावी या हेतूने गावात धार्मिक स्थळ असो की राजकीय सभा किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असो तिथे भोंग्यांना बंदी बाबत ठरावच ग्रामसभेत केला. असे उपसरपंच बाळासाहेब देशमुख सांगतात. कोणता कार्यक्रम असला तर त्यावेळी मर्यादीत आवाजात बॉक्स लावण्याची मुभा आहे.
आता ग्रामसभेत मंजूर झालेल्या या ठरावाची अमलबजावणी होऊन सात वर्ष झाली आहेत. पंचक्रोशीत सर्वानाच बारड गावातील भोंगाबंदीबाबत माहिती झाली आहे. त्यामुळे गावात लग्न समारंभ असो वा अन्य कोणताही समारंभ असो, भोंगा लावलाच जात नाही. भोंग्या ऐवजी या गावात साउंड बॉक्स वापरण्याची मुभा आहे. अर्थात मर्यादित आवाजात ते लावता येतात. आता कोणतेही साउंड सिस्टीमचे दुकानदार देखील या गावात भोंगे भाड्यानेही देत नाही. खरंतर ग्रामसभेने घेतलेला भोंगेबंदीचा निर्णय सुरुवातील अगदी छोटा वाटला. पण पुढे या निर्णयामुळे गावातील वादावादीचे प्रमाण कमी झाले. मुलांना अडथळ्याविना शिक्षण घेता यायला लागले. अश्या असे अनेक सकारात्मक परिणाम दिसायला लागले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world