विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur News: अमरावती आणि नाशिकमधील घटनांची धग अद्याप कमी झालेली नाही, तोच कोल्हापूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवणे आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा संतापजनक प्रकार कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात उघडकीस आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सध्या दहशतीखाली आणि संतापात असून, यामागे मोठे 'सेक्स स्कॅन्डल' असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कोल्हापूर शहराच्या वेशीवर असलेल्या पुलाची शिरोली गावातील शाहिद सनदे नावाच्या तरुणाने एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेतील तरुणींशी मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर त्याने प्रेमात केले आणि तरुणींना विश्वासात घेऊन त्यांचे आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ चित्रित केले. धक्कादायक बाब म्हणजे, हे व्हिडिओ त्याने केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आपल्या मित्रपरिवारात देखील शेअर केले. हिंदुत्ववादी संघटनांच्या दाव्यानुसार, या तरुणाने 10 पेक्षा जास्त मुलींसोबत अशा प्रकारचे कृत्य केले असून हे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाचा सुगावा लागताच परिसरात मोठा उद्रेक झाला. हातकणंगले पोलिसांनी तातडीने हालचाल करत मुख्य संशयित आरोपी शाहिद सनदे याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कृत्यात त्याला साथ देणारा शाहरुख देसाई हा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शाहिदने पोलिसांसमोर आपले कृत्य कबूल केले असून, त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे आता समोर येत आहे.
( नक्की वाचा : Amravati News: अमरावतीमध्ये चायनीजच्या गाड्यांवरून लव्ह जिहादाचा कट? भाजपा खासदारांच्या 5 मोठ्या मागण्या )
गाव बंद आणि संतापाचा उद्रेक
या घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्या घराचे वीज-पाणी कनेक्शन तोडून घरावर बुलडोझर फिरवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाने या प्रकरणाला वाचा फोडली असून, हे प्रकरण केवळ प्रेमसंबंधांपुरते मर्यादित नसून यामागे 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतरण'चे कनेक्शन असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
वडिलांनीच मागितली फाशीची शिक्षा
या संपूर्ण प्रकरणात एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बाजू म्हणजे संशयित आरोपी शाहिदच्या वडिलांनी घेतलेली भूमिका. आपल्या मुलाचे कृत्य निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. 'माझ्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा करा, त्याला थेट फाशी द्या' अशी मागणी त्याच्या वडिलांनीच केली आहे. या प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी व्हावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिकच्या मुलीला मलेशियात पाठवण्याचा होता डाव; TCS धर्मांतर प्रकरणात 'मालेगाव लिंक'चा मोठा खुलासा )
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुलाची शिरोलीतील या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या एका तरुणीने हिंमत दाखवून तक्रार दिल्याने हे प्रकरण उघडकीस आले, मात्र पीडित मुलींची संख्या मोठी असण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, या टोळीत अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world