Palghar News : स्मशानभूमीतील अघोरी पूजा गावकऱ्यांकडून उद्ध्वस्त; मांत्रिक पळाला तर तरुणाचं संतापजनक कृत्य

ग्रामस्थांनी अघोरी पूजेबाबत जाब विचारला असता पूजेत सहभागी असलेल्याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रतिनिधी, मनोज सातवी 

Aghori Puja at Palghar Village : पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सातिवली गावात अघोरी पूजा आणि जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अघोरी पूजा आणि जादूटोण्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या आधीच अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर पूजेत सहभागी असलेल्या अशोक बात्रा याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालून अरेरावी करत घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. घटनास्थळी अघोरी पूजेसाठी पिठाची बाहुली, लिंबू,चाकू, पांढरी टोपी, बिडी - सिगरेट, कोंबड्याची पिसे, अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले आहे. (Black Magic)

अघोरी पूजा आणि जादू टोण्याच्या प्रकारामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता असून पूजा घालणाऱ्या विरोधात पोलिसांना कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या सातिवली गावातील पाटील पाड्याच्या स्मशानभूमी परिसरातील ओहोळा लगतच्या खडकावर अघोरी कृत्य आणि पूजा सुरू असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले होते. याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटा मुक्ती अध्यक्ष, महिला आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजास्थळी ग्रामस्थ येत असल्याची कुणकुण लागताच अघोरी पूजा करणाऱ्या आणि पुजाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी अघोरी पूजेबाबत जाब विचारला असता पूजेत सहभागी असलेल्याने ग्रामस्थांसोबत हुज्जत घालत अरेरावीची करत घटनास्थळावर निघून गेला. 

नक्की वाचा - जोशी बाईंना फिरण्याची आवड, टूर प्लानिंग करणाऱ्यानेच केला घात; 48 तासात मृत्यूचं गूढ उलगडलं!

याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देऊन सुद्धा पोलीस घटनास्थळी फिरकले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article