समाधान कांबळे, प्रतिनिधी
घर बांधणं हा अनेकांच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा क्षण असतो. व्यक्ती आयुष्यभराची पुंजी एकत्र करून घर उभं करतो. मात्र हिंगोलीत याच नव्या घरावरुन जादूटोणाचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीतील एका व्यक्तीच्या नव्या घरात अघोरी पूजा करीत चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली आहे. या चिठ्ठीत तुझं नवीन घर पाड, अन्यथा तुझ्या बायकोला जिवे मारू असं म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दाभडी गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. येथे नव्याने बांधलेल्या घरात जादूटोण्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. येथील एका व्यक्तीने नवं घर बांधलं होतं. मात्र या घरामध्ये हळद, कुंकू, अक्षता, बिबे यांसह जादूटोण्याची पूजा मांडण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्या जागी एक धमकीची चिठ्ठीही सापडली आहे.
नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात
या चिठ्ठीत 'तुझं नवीन बांधलेलं घर पाड, अन्यथा तुझ्या बायकोला जिवे मारू' अशी धमकी देण्यात आली आहे. याशिवाय, घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची सीट सुद्धा अज्ञात व्यक्तीने जाळली आहे. एवढ्यावरच न थांबता, दोन दिवसांत तीन वेळा घराबाहेर सुकत घातलेले पत्नीचे कपडे देखील पेटवून दिले आहेत. या प्रकारामुळे घाबरलेल्या नवनाथ बोंढारे यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकारानंतर ही संपूर्ण कुटुंब आणि गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.