सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ आणि आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'घराचं बांधकाम करण्यासाठी माहेरातून चार लाख रुपये घेऊन ये', यासाठी सासरच्या मंडळींकडून प्रियाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. त्याला कंटाळून 23 वर्षीय प्रियाने विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. व्हॉटसअपवरील मेसेजमुळे या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चार लाखांसाठी प्रियाचा गेला जीव...
प्रिया शुभम ढगे असं मृत विवाहितेचे नाव आहे. तिचं माहेर राहाता तालुक्यातील एकरुखे येथे आहे. तर तिचं सासर कोऱ्हाळे येथे आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी प्रियाने शुभमशी लग्न केलं होतं. त्यानंतर मे २०२४ ते ३ मे २०२६ या काळात प्रियाच्या सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ केला जात होता. 'घराचं बांधकाम करायचं आहे, तुझ्या वडिलांकडून चार लाख रुपये घेऊन ये' अशी मागणी करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ आणि उपाशी ठेवण्याचे प्रकारही घडत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जिथून लग्नाची पाठवणी केली तिथच भयंकर शेवट
छळाला कंटाळून प्रियाने आपल्या माहेरी एकरुखे येथे वडिलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मोबाइलवरून आपल्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती दिल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणी प्रियाचे नातेवाईक अनिल बाळासाहेब बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे राहाता तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांवर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.