योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सभेसाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या एका दलित महिला पदाधिकाऱ्याला हॉटेलच्या मॅनेजरने 'जात' आणि 'पक्षीय चिन्ह' पाहून रूम देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हॉटेलच्या मॅनेजरविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा डॉ. स्नेहल सोहनी या अकोल्यात दाखल झाल्या होत्या. मुक्कामासाठी त्या शहरातील रायझिंगसन हॉटेलमध्ये गेल्या. सुरुवातीला त्यांना हॉटेलमध्ये रूम दाखवण्यात आली होती.
मात्र, डॉ. सोहनी यांच्या सामानात पंचशील आणि निळा ध्वज (वंचित बहुजन आघाडीचे पक्षीय चिन्ह) दिसल्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने अचानकपणे रूम देण्यास नकार दिल्याचा आरोप डॉ. सोहनी यांनी केला आहे. हा नकार 'दलित' असल्याच्या कारणामुळे देण्यात आला, असा त्यांचा दावा आहे.
(नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये मशिदीबाहेर तुफान राडा; नमाज पठणावरून दोन गट भिडले! 'हे' होतं कारण )
तक्रार दाखल
या प्रकारानंतर, डॉ. सोहनी यांनी कोणताही विलंब न करता सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन हॉटेल मॅनेजरविरोधात तात्काळ तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत हॉटेल मॅनेजरविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी सांगितले की, फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारावर सखोल चौकशी सुरू आहे.घटनेची सत्यता पडताळण्यासाठी हॉटेलमधील CCTV फुटेजची देखील तपासणी केली जात आहे.