Akola News: चिमुकलं बाळ रुग्णालयात, आईची हत्या अन् बाप पोलीस कोठडीत; अकोल्यातील त्या हत्येमागील सत्य उघड

Akola News: अकोल्यातील डाबकी रोड परिसरात सोमवारी सायंकाळी एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola News: अवघ्या 15 दिवसांच्या बाळाचे छत्र हरवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अकोला:

योगेश शिरसाठ, प्रतिनिधी

Akola News: अकोल्यातील डाबकी रोड परिसरात सोमवारी सायंकाळी एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कौशल्याने गुन्ह्याचा उलगडा केला असून, नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्याच पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीसह त्याच्या कुटुंबातील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या 15 दिवसांच्या बाळाचे छत्र हरवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्नपूर्णा माता मंदिरासमोर एका 24 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या आणि ओळख लपवण्याच्या उद्देशाने मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जाळला होता. त्यामुळे सुरुवातीला ही महिला कोण आहे, हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. 

Advertisement

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात ही महिला मंगळूरपीर येथील रहिवासी रविना पवार असल्याची ओळख पटली.

( नक्की वाचा : संभाजीनगरमध्ये 2 मुलांच्या आईची भररस्त्यात हत्या; चुलत दिरासोबतच्या लग्नानंतर 'त्या' एका निर्णयाने घात झाला ! )
 

प्रेमविवाह आणि वादाचा करुण अंत

रविना पवार हिने सादिक शहा तसरीफ शहा (वय 29) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर हे दाम्पत्य काही काळ मुंबईत वास्तव्यास होते आणि त्यानंतर ते अकोल्यात भाड्याने खोली घेऊन राहत होते. त्यांना एक लहान मुलगा असून रविना नुकतीच बाळंतीण झाली होती. मात्र, पती-पत्नीमध्ये मागील काही काळापासून वारंवार वाद होत होते. याच वादातून सादिक शहाने टोकाचे पाऊल उचलले आणि पत्नी रविनाचा गळा दाबून खून केला.

पुरावा नष्ट करण्यासाठी कुटुंबाची साथ

हत्या केल्यानंतर सादिकने हा गुन्हा लपवण्यासाठी आपल्या कुटुंबाची मदत घेतली. यामध्ये त्याची आई नुराबी शहा आणि जावई इरफान शहा यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याला साथ दिली. 

चेहरा जाळून ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तपासापुढे त्यांचा हा बनाव टिकला नाही. पोलिसांनी सादिकसह त्याच्या आईला आणि जावयाला अटक केली आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Solapur News : 14 वर्षांची नवरी, 19 वर्षांचा नवरा, 4 महिन्यातच सारा खेळ संपला! प्रकरण वाचून अंगावर येईल काटा )

15 दिवसांच्या चिमुकल्याचे काय होणार?

या संपूर्ण क्रूर घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रविनाचे अवघ्या 10 ते 15 दिवसांचे बाळ. आपल्या आईची हत्या आणि वडील जेलमध्ये गेल्यामुळे हे बाळ पोरके झाले आहे. सध्या या बाळावर जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बाळाची प्रकृती स्थिर असून, पुढील काळात बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली त्याला शिशुगृहात ठेवण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे. एका कुटुंबाचा असा भयानक अंत झाल्याने अकोला परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article