योगेश शिरसाट
अकोला शहरातील गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. महिला अत्याचाराच्या घटनामध्ये होत असलेली वाढ ही तर चिंताजनक आहे. यावर अकोला पोलिस अंकुश ठेवण्यात कुठेतरी कमी पडत आहेत का अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत चालल्याचे चित्रे आहे. तीन-चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या एका अल्पवयीन मुलीवर ऑटो रिक्षा चालकांने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या आरोपीला काही तासातच पोलिसांनी अटकही केली. पण आरोपींना काही धाक राहीलेला दिसत नाही. हा घटना ताडी असतानाच महिला अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील जठारपेठ या गजबजलेल्या रस्त्यावर कारमध्येच एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. अत्याचार होत असताना त्या तरुणीने हिंमत दाखवली. स्वतःचा बचाव करताना तिने आरोपीच्या प्रायव्हेट पार्टवर वार केला. त्यानंतर ती त्याच्या तावडीतून सुटली. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. शिवाय तरुणींमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ती युनिट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ही तरुणी 'युनिट मॅनेजर' म्हणून कामाला आहे. ती 22 वर्षांची आहे. तिच्या सोबत याच कंपनीत एजंट काम करतो. त्याचे नाव गणेश ठाकूर असं आहे. त्यानेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर या एजंटने तरुणीला मोबाईल मेसेजद्वारे बदनामीची धमकी दिली. शिवाय आत्महत्या करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होता. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठलं.
नक्की वाचा - Dhule News: माजी सैनिक चंदू चव्हाणला मारहाण, आधी लाथ मारली मग धक्का दिला, Video Viral
तिथं गणेश ठाकूर या एजंट विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. यानंतर याबाबतचा पोलीस तपास करत असून आरोपी मात्र फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे.. याप्रकरणी आरोपी विरोधात विविध कलमानूसार गुन्हा दाखल झाला आहे. दिवसेंदिवस अकोल्यात गुन्हेगारी वाढत आहे. शिवाय पोलिसांचा धाक ही कमी झाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी ही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. असा घटनांना आळा घालावा यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहीजे असं स्थानिकांनी सांगितलं आहे.