योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: प्रेमाचे खोटे नाटक रचून एका महिलेचा विश्वास संपादन करायचा आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्या व्यक्तीवर तिने जीवापाड प्रेम केले, तोच आधीपासून विवाहित असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेच्या पायाखालची वाळूच सरकली. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या फसवणुकीचा अंत अखेर पोलीस कोठडीत झाला आहे.
लग्नाचे आमिष आणि 2 वर्ष अत्याचार
ही धक्कादायक घटना अकोला शहरात उघडकीस आली आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाने संबंधित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. लवकरच लग्न करू असे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडितेसोबत जवळीक निर्माण केली. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने गेल्या 2 वर्षात तिच्यावर वारंवार अत्याचार केले, यामध्ये अनैसर्गिक अत्याचाराचाही समावेश आहे. जेव्हा जेव्हा महिला लग्नाचा विषय काढायची, तेव्हा तो काहीतरी कारण सांगून वेळ मारून न्यायचा.
( नक्की वाचा : Pune News: खेळता खेळता काळ आला! पुण्यातील सोसायटीत लिफ्टमध्ये अडकून 7 वर्षांच्या शिवांशचा अंत; नेमकं काय घडलं? )
मोबाईलमधील फोटोंनी उघडले गुपित
आरोपीच्या वागण्यावरून संशय आल्यानंतर महिलेने त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी तिला काही फोटो आणि माहिती मिळाली, ज्यातून तिला धक्कादायक सत्य समजले. संबंधित तरुण आधीच विवाहित होता आणि हे सत्य त्याने लपवून ठेवले होते. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने त्याला जाब विचारला. मात्र, सत्य समोर येऊनही आरोपीने तिचा पाठलाग करणे आणि तिला धमकावणे सुरूच ठेवले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
( नक्की वाचा : KDMC मध्ये समाजकंटक आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अनधिकृत होर्डिंगचा धंदा, भाजपा नगरसेवकाचा मोठा आरोप )
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 20 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे पथक करत आहे. प्रेमसंबंधांच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world