बळीराजाच्या 'माऊली'शी खेळ; अकोल्यात कृषी विभागाची मोठी कारवाई; 92 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : कृषी आढावा बैठक दोन दिवसापूर्वी पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात कृषी अधिकाऱ्यांसोबत झाली. खते आणि बियाणे बोगस आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत विनापरवाना साठवून ठेवण्यात आलेले 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक अर्थात खतांचा मोठा साठा जप्त केला आहे. ॲग्रोटोनिक एशियन इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोदामात ही छापेमारी करण्यात आली. पिकांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या या जैव उत्प्रेरकांची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याची माहिती कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कृषी विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकत गोदामाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची उत्पादने साठवून ठेवलेली आढळून आली.

92 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त...
 

कारवाईदरम्यान पथकाने एकूण 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक जप्त केले असून त्यामध्ये 3 हजार 827 लिटर द्रवरूप खतांचा तसेच 31 हजार 141 किलो घनरूप खतांचा समावेश आहे. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत तब्बल 92 लाख 5 हजार रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाने संबंधितांकडे उत्पादनांचा परवाना, साठवणूक परवाना तसेच करारनाम्याची मागणी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे ही उत्पादने बेकायदेशीररित्या साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या खतांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Advertisement

नक्की वाचा - मृत चिमुरड्याच्या घट्ट मुठीत खाऊचं पाकिट, मृतदेह बाहेर काढताना गावकरीही हळहळले; आई-बापाचं संतापजनक कृत्य

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि खत नियंत्रण आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने जप्त केलेल्या खतांचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता तपासली जाणार आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर या जैव उत्प्रेरकांचा प्रत्यक्ष वापर शेतकऱ्यांसाठी किती सुरक्षित होता, याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे. दरम्यान, कृषी विभागाने विनापरवाना खत विक्री आणि साठवणुकीविरोधात पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे अकोल्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून बेकायदेशीर खत विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.