जाहिरात

Akola News : अकोल्यात पोलिसांचा जीव धोक्यात? अवैध काम करणाऱ्यांविरोधात कारवाईदरम्यान घडला भयंकर प्रकार

एवढेच नव्हे तर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Akola News : अकोल्यात पोलिसांचा जीव धोक्यात? अवैध काम करणाऱ्यांविरोधात कारवाईदरम्यान घडला भयंकर प्रकार

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola News : जिल्ह्यातील म्हैसांग गावात वाळू तस्करीशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शुभम मानकर नावाचा ट्रॅक्टर चालक नदीतून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करत असताना बोरगाव मंजू पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांशी हुज्जत घालत दादागिरी केली. एवढेच नव्हे तर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, चालकाने चाकू आणि तलवारीचा धाक दाखवत पोलिसांना घाबरवले आणि परिस्थिती अधिक चिघळवली. दरम्यान पोलीस कारवाई का करतो याचा राग मनात धरून वाळू माफियाने ही हिम्मत केली असल्याचं बोललं जात आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील धक्कादायक दृश्यांनुसार व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर चालकाची आक्रमकता स्पष्टपणे दिसून येते. चालकाने ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करत पोलिसांच्या वाहनावर चालवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांचे जीवित धोक्यात आले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण पोलिसांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये केले आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती असून तो आता प्रसार  माध्यमांच्या हाती लागला आहे. इतक्या गंभीर प्रकारानंतरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.

वाळू माफियांची दादागिरी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..

अकोल्याच्या शुभम मानकर याच्यावर यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याचे समोर येत आहे. तहसीलदार आणि पोलिसांसोबत त्याचे वारंवार वाद झाले असूनही कठोर कारवाई झालेली नाही. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारात वाळू माफियांनी खनिकर्म विभागाच्या महिला अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला करून वाहनाचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांचे धाडस वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही ठिकाणी हप्त्यांच्या चर्चाही समोर येत असून यामुळेच माफियांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असल्याचे चित्र असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com