योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : शहरातील जवाहर नगर परिसरात गुरुवारी एका तरुणाकडून मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुण मुलींना अश्लील इशारे करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमधील दृश्यांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसून, NDTV मराठी कोणताही दावा करीत नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण नागरिकांनी सावधगिरीने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मुलींचा प्रतिकार; आरोपीला धडा..
या घटनेदरम्यान संबंधित तरुणाने गुरुवारी दुपारी अश्लील इशारे केल्याने संतप्त झालेल्या दोन मुलींनी सामाजिक कार्यकर्ते जीवन डीगे आणि इतरांच्या मदतीने धाडस दाखवत त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या प्रकारानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी करत या प्रकाराचा निषेध केला. अनेकांनी मुलींच्या धाडसाचे कौतुक करत अशा टवाळखोरांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत सोशल मीडियावर व्यक्त केले. तर दुसरीकडे शहरात दिवसेंदिवस छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तरुण मानसिक स्थितीची चर्चा; तक्रार नाही..
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित तरुण हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्याचे वर्तन काहीसे विचित्र असून तो मतिमंद असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पीडित मुली किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच बदनामीच्या भीतीमुळे अनेकदा मुली पुढे येत नसल्याचेही वास्तव या निमित्तानं समोर आलं आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा घटनांची योग्य नोंद होणं आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.