योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात कौटुंबिक वादातून एका जावयाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (10 सप्टेंबर) संध्याकाळी सुमारे 6:00 वाजता घडली. या घटनेत नागेश पायरुजी गोपनारायण (वय 40, रा. कानशिवनी, ता. अकोला) यांचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना त्यांच्या सासरवाडीतच घडल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
कौटुंबिक वाद विकोपाला
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश गोपनारायण हे त्यांच्या सासरवाडीत अंबाशी येथे आले होते. यावेळी त्यांच्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी काही नातेवाईकांनी नागेश यांच्यावर धारदार शस्त्र, चाकू आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात नागेश यांचा जागीच मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात वंचितच्या नेत्याच्या मुलावर 7 वार; संतप्त समर्थकांकडून आरोपीचे वाहन जाळून हल्ला )
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमान डोपेवार आणि चान्नी पोलीस ठाण्याचे रवींद्र लांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे.
सध्या पोलिसांनी मृत नागेश यांची पत्नी छाया हिच्या माहेरच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. लवकरच आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अंबाशी गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास पातूर पोलीस करत आहेत.