
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News : अकोला शहरात आज, (शुक्रवार 5 सप्टेंबर) दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांचा मुलगा यश पातोडे याच्यावर चाकूने 7 वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पातोडे समर्थकांनी आरोपीचे वाहन जाळल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपी सूरज आत्माराम इंगोले (वय 31) याने यश पातोडे (वय 24) याच्या घरात शिरून त्याच्यावर चाकूने 5 ते 7 वेळा वार केले. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
( नक्की वाचा : Pune News : गणेश विसर्जन पूर्वसंध्येला पुणे हादरलं; नाना पेठेत गँगवॉर, कुख्यात आरोपीच्या मुलाचा खून )
या घटनेची माहिती शहरात पसरताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पातोडे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी आरोपी सूरज इंगोलेच्या घरासमोर उभी असलेली ओमनी चारचाकी गाडी फोडून पेटवून दिली. त्यांनी इंगोले यांच्या घरावरही हल्ला केला. या हल्ल्यात सूरज इंगोले देखील जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला आहे.

या घटनेनंतर खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world