Akola News : अकोल्यात 'खाकी' ला डाग, थेट SP ऑफिसमध्येच लाच घेताना 'मॅडम' ना अटक

Akola News : जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau - ACB) मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola News : पोलीस विभागाच्या अतिमहत्त्वाच्या कार्यालयातच ही कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola News : अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) कार्यालयातच आज (गुरुवार, 6 नोव्हेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau - ACB) थेट कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक ममता संजय पाटील यांना तक्रारदाराकडून 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस विभागाच्या अतिमहत्त्वाच्या कार्यालयातच ही कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, यामुळे खाकी वर्दीच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील तक्रारदार हे धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी आहेत. त्यांच्या वेअरहाऊसमधील धान्याची एका दलालाकडून फसवणूक झाल्यामुळे त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला होता. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी आरोपीस मदत केल्याने त्याला जामीन मिळाला. यावर कारवाई व्हावी, यासाठी तक्रारदारांनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या चौकशीचा अहवाल यापूर्वीच अपर पोलीस अधीक्षकांनी सादर केला होता. त्यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी आवश्यक असलेल्या 'नोटशीट' (Notesheet) ची तयारी वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांच्याकडे होती. ही नोटशीट वरिष्ठांना सादर करण्यापूर्वी पाटील यांनी तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 10,000 रुपये अगोदर आणि उर्वरित 10,000 रुपये नंतर देण्याची मागणी त्यांनी केली होती.

( नक्की वाचा : Kalyan Station: आई-वडिलांना गाढ झोपेत पाहून बाळाला पळवले! तरुण-आत्याने 8 महिन्यांच्या चिमुकल्याचे काय केले? )
 

एसीबीने रचला यशस्वी सापळा

तक्रारदाराने लाच देण्याऐवजी थेट अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. एसीबीने प्राथमिक पडताळणी पूर्ण केल्यानंतर आज, 6 नोव्हेंबर रोजी, अकोल्यात सापळा रचला. वरिष्ठ लिपिक ममता पाटील यांनी तडजोडीअंती 8,000 रुपयांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.

Advertisement

ही महत्त्वपूर्ण सापळा कारवाई मा. पोलीस अधीक्षक (एसीबी) मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे, आणि पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, तसेच पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, हवालदार राहुल वंजारी, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, आणि चालक सतीश किटुकले यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

(नक्की वाचा : Mumbai Local Train: ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प! CSMT वर कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन, ठाण्यातही रेल रोको )
 

नागरिकांमध्ये संतापाची लाट

लाच स्वीकारणाऱ्या महिला लिपिकांविरुद्ध अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका बाजूला एसपी कार्यालयाकडून 'ऑपरेशन प्रहार' द्वारे गुन्हेगारीवर कारवाई केली जात असताना, याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने लाच मागितल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.

Advertisement

या प्रकरणात फिर्यादी व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याची चर्चा सुरुवातीला होती, परंतु एसीबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, फिर्यादी हे खाजगी व्यापारी आहेत. या घटनेमुळे 'खाकी'वर पुन्हा एकदा डाग लागल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

Topics mentioned in this article