1 लाख रुपयांचा लॅपटॉप फक्त 15 हजार रुपयांत! Amazon ला लुबाडणाऱ्या भामट्यांची पद्धत वाचून व्हाल थक्क!

Amazon Refund Scam: लॅपटॉप, ग्राफिक्स कार्ड आणि महागडे ड्रोन्स फुकटात मिळवण्यासाठी या टोळीने 'रिफंड' प्रक्रियेचा असा काही वापर केला की अ‍ॅमेझॉनची यंत्रणाही चक्रावून गेली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Amazon Refund Scam: हा प्रकार वारंवार घडत असल्याने अ‍ॅमेझॉनच्या तपास अधिकाऱ्यांनी गुप्तपणे या टोळीशी संपर्क साधला. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Amazon Refund Scam: ऑनलाइन शॉपिंग म्हटलं की अ‍ॅमेझॉनवर आपला मोठा विश्वास असतो, पण याच विश्वासाचा गैरवापर करून एका टोळीने अ‍ॅमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीलाच 4 दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्बल 30 कोटी रुपयांचा जबरदस्त फटका दिला आहे. लॅपटॉप, ग्राफिक्स कार्ड आणि महागडे ड्रोन्स फुकटात मिळवण्यासाठी या टोळीने 'रिफंड' प्रक्रियेचा असा काही वापर केला की अ‍ॅमेझॉनची यंत्रणाही चक्रावून गेली. टेलिग्रामच्या माध्यमातून चालणाऱ्या या मोठ्या रॅकेटचा आता पर्दाफाश झाला आहे.

कसा चालयचा हा 'रिफंड'चा खेळ?

या फसवणुकीमागे 'आरबीके' (RBK) नावाचा एक ग्रुप होता. त्यांनी टेलिग्रामवर आपले चॅनल सुरू केले होते आणि तिथे ते 'रिफंड सर्व्हिस' देण्याची जाहिरात करायचे. एखादा ग्राहक अ‍ॅमेझॉनवरून महागडी वस्तू खरेदी करायचा आणि त्यानंतर आपल्या अकाऊंटचे डिटेल्स या ग्रुपला द्यायचा. हा ग्रुप मग अ‍ॅमेझॉनच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून सांगायचा की, आम्हाला जे पार्सल मिळालं ते रिकामं होतं किंवा आम्हाला वस्तू मिळालीच नाही.

Advertisement

हा दावा खरा वाटावा म्हणून हे भामटे चक्क बनावट पोलीस रिपोर्ट तयार करायचे. याला तांत्रिक भाषेत 'सोशल इंजिनिअरिंग' म्हणतात. अ‍ॅमेझॉनकडून पूर्ण पैसे परत मिळाले की, हा ग्रुप त्या ग्राहकाकडून ऑर्डरच्या रकमेच्या 15 ते 30 टक्के कमिशन घ्यायचा. म्हणजेच 1 लाख रुपयांचा लॅपटॉप ग्राहकाला केवळ 30 हजार रुपयांत मिळायचा आणि मूळ वस्तूही ग्राहकाकडेच राहायची. अशा पद्धतीने या टोळीने अ‍ॅमेझॉनला कोट्यवधींचा चुना लावला.

( नक्की वाचा : Solapur News: मराठा नवरी सांगून घरात आणली, ती तर निघाली मुस्लीम अन् विवाहित! लग्नानंतर 4 दिवसांत... )

असा लागला घोटाळ्याचा छडा

हा प्रकार वारंवार घडत असल्याने अ‍ॅमेझॉनच्या तपास अधिकाऱ्यांनी गुप्तपणे या टोळीशी संपर्क साधला. त्यांनी स्वतः एक वस्तू ऑर्डर केली आणि या ग्रुपला पैसे देऊन रिफंड मिळवला. या व्यवहारादरम्यान वापरलेले आयपी (IP) ॲड्रेस आणि टेलिग्रामवरील व्हिडिओंचा तांत्रिक तपास केल्यावर कझाकस्तानमधील डायस तेमिरबेकुल झुमानियाझ या मुख्य सूत्रधाराचे नाव समोर आले. यासोबतच मायकल बॉशेल्ट आणि अदनान इस्लाम या सहकाऱ्यांवरही कंपनीने आता कोर्टात खटला भरला आहे.

अ‍ॅमेझॉनची मोठी मागणी

फेब्रुवारी 2023 पासून सुरू असलेल्या या घोटाळ्यात आतापर्यंत 2100 पेक्षा जास्त बनावट व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अ‍ॅमेझॉनने आता या आरोपींकडून पूर्ण 30 कोटींची नुकसान भरपाई आणि कायदेशीर तपासाचा 75,000 डॉलरपेक्षा जास्त खर्च वसूल करण्याची मागणी केली आहे. या टेलिग्राम चॅनलवर 1000 पेक्षा जास्त सदस्य होते, जे अशा प्रकारे फसवणूक करून महागड्या वस्तू लांबवत होते.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात थरार! घरी परतणाऱ्या तरुणाला गाठले आणि बांबूने फोडले; कारण काय? )

सामान्य ग्राहकांसाठी धोक्याची घंटा

या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याचा थेट परिणाम भारतात बसू शकतो. अ‍ॅमेझॉनची रिफंड प्रक्रिया ही सध्या ग्राहकांच्या विश्वासावर आधारित आणि सोपी आहे. मात्र, अशा फ्रॉडमुळे कंपनी आता आपले नियम अधिक कठोर करण्याची शक्यता आहे. नियम कडक झाले, तर प्रामाणिक ग्राहकांनाही वस्तू परत करताना किंवा पैसे मिळवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.
 

Advertisement
Topics mentioned in this article