संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Solapur Marriage Scam: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात एका तरुणाच्या आयुष्याचा मोठा खेळ झाला आहे. लग्न होत नसल्याची अडचण ओळखून एका टोळीने या तरुणाला जाळ्यात ओढले आणि त्याचे लग्न लावून दिले. मात्र, ज्या नवरीला तो सुखी संसाराची स्वप्ने बघत घरी घेऊन आला, तिने अवघ्या काही दिवसांतच आपले खरे रूप दाखवले. ही नवरी मराठा समाजाची असल्याचे सांगून लग्न लावले होते, पण प्रत्यक्षात ती विवाहित मुस्लीम महिला असल्याचे उघड झाले आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणाची सुरुवात लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका महिला एजंटपासून झाली. सुरेखा सूर्यवंशी नावाच्या या एजंटने मंगळवेढ्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मुलगी मराठा समाजाची आहे आणि अत्यंत गरीब घरची आहे, असे सांगून या एजंटने मुलाकडच्या लोकांकडून तब्बल 2 लाख 70 हजार रुपये उकळले. मुलाच्या हट्टापायी आणि घराच्या गरजेपोटी कुटुंबाने एवढी मोठी रक्कम एजंटच्या हवाली केली आणि धूमधडाक्यात लग्न लावून दिले.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिकच्या मुलीला मलेशियात पाठवण्याचा होता डाव; TCS धर्मांतर प्रकरणात 'मालेगाव लिंक'चा मोठा खुलासा )
चार दिवसांत फुटले नवरीचे बिंग
लग्न झाले, अक्षता पडल्या आणि नवरी घरी आली. मात्र, संसाराचे स्वप्न अवघे 4 दिवसच टिकले. चौथ्या दिवशी ही नवी नवरी घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना घरच्यांच्या लक्षात आले. तरुणाने सतर्कता दाखवत तिचा पाठलाग केला आणि तिला पकडले. यावेळी तिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ही महिला मराठा समाजाची नसून मुस्लीम धर्मीय असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, ती आधीच विवाहित असून तिला मुलेही आहेत. केवळ पैशांसाठी या महिलेने एजंटसोबत संगनमत करून हे बनावट लग्न केले होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने तातडीने मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले. आपली 2 लाख 70 हजार रुपयांची आर्थिक लूट झाल्याची आणि भावनिक फसवणूक झाल्याची तक्रार त्याने दिली. पोलिसांनी त्वरित पावले उचलत त्या तोतया नवरीला आणि फसवणूक करणाऱ्या एजंट महिलेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामागे अजून मोठी टोळी सक्रिय आहे का? त्यांनी आणखी किती जणांची अशीच फसवणूक केली आहे? याचा सखोल तपास आता मंगळवेढा पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात थरार! घरी परतणाऱ्या तरुणाला गाठले आणि बांबूने फोडले; कारण काय? )
ग्रामीण भागात नवरी मिळेना म्हणून वाढली गुन्हेगारी
मराठा समाज आणि ग्रामीण भागात सध्या तरुणांची लग्ने वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन अशा भामट्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गरीब घरातील मुलगी असल्याचे सांगून किंवा जात लपवून लग्न लावून देणे आणि नंतर पैसे घेऊन नवरीने पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे एजंटच्या माध्यमातून पैसे देऊन लग्न करताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world