Kalyan News: कल्याणमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन दोन जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण पूर्वेतील आडवली-ढोकळी परिसरात हा प्रकार घडला.
काय आहे प्रकरण?
अभिजीत गुप्ता असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. अभिजित त्यांचे काम संपवून घराच्या दिशेने जात होते. आडवली-ढोकळी परिसरातील गणेश बिल्डिंगसमोर आले असता, आरोपी आर्यन शहा आणि त्याच्या साहिल नावाच्या नातेवाईकाने अभिजीत यांना हाक मारून थांबवले. काही समजण्याच्या आतच दोघांनी अभिजीत यांच्यावर बांबूने हल्ला चढवला. या हल्ल्यात अभिजीत गंभीर जखमी झाले असून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अभिजीत गुप्ता यांनी तातडीने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर गुप्ता कुटुंबाने पोलिसांत धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाला आहे. काही महिन्यांपूर्वी अभिजीत गुप्ता आणि आरोपीच्या भावामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून आर्यन आणि साहिलने हा पूर्वनियोजित कट रचून हल्ला केल्याचे उघड झाले आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण
कल्याण पूर्वेतील वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
( नक्की वाचा : Kalyan News:लग्नाच्या 2 दिवस आधी काका-पुतण्यात तुंबळ हाणामारी; कल्याणच्या घटनेला नवं वळण, पोलिसही चक्रावले! )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world