निनाद करमरकर, प्रतिनिधी
अंबरनाथमध्ये मनसेच्या शहर संघटकावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. युसूफ शेख असं त्याचं नाव असून चक्क मनसेचा झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमांसाची वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हिंदुत्त्ववादी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्याच पदाधिकाऱ्याचे हे कारनामे माहीत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आता ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
नक्की वाचा - Elon Musk : मेट्रोमध्ये महिलेला पेटवलं, आरोपी शांतपणे पाहत राहिला..., एलन मस्क म्हणाले, WOW!
युसूफ शेख याचा भाऊ जलालूद्दीन शेख यानेच अंबरनाथ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून पुरावा म्हणून एका पेन ड्राईव्हमध्ये त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना दिले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये युसूफ शेख हा एका खोलीत उभा असल्याचं दिसत आहे. त्याचे काही साथीदार गोहत्या करून गोमांस कापत असल्याचं सांगितलं जात आहे. दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या हत्या करण्यात आल्या असून गोवंशाची कापून ठेवलेली डोकी दिसत आहेत.
या गोवंशाचं मांस एका फोर्ड इंडिव्हर गाडीत ठेवलं जात असून ही गाडी युसूफ शेख याचीच आहे, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच गाडीवर मनसेचा झेंडा सुद्धा आहे. युसूफ शेख याचा अनेक वर्षांपासून गोमांस विक्रीचा धंदा असून यापूर्वी सुद्धा एकदा त्याच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यावेळेस पक्षानं त्याच्यावर काहीही कारवाई केली नव्हती. पण आता राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका पाहता मनसेतून युसूफ शेखवर नाराजी आहे. यापुढे त्यांच्यावर आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.