घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलली म्हणून मारहाण; लग्नाच्या दीड महिन्यात सासरकडून भयंकर छळ, अखेर...

दीड महिन्यांपूर्वीच विशाखाने लग्न करून गृहप्रवेश केला होता. अवघ्या दीड महिन्यात सासरच्यांनी तिचं जगणं कठीण केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ambernath News : पत्नी दिवसभर काय करते, कोणाशी बोलते यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर पतीकडून घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, शेजाऱ्यांशी बोलली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली आणि अखेर सासरच्या छळाला कंटाळून अंबरनाथ येथील २६ वर्षीय विशाखा तिळकर हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यांपूर्वीच तिने लग्न करून सासरच्या घरात गृहप्रवेश केला होता. या प्रकरणात डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. तर सासू आणि दीर यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

माहेराहून दागिने अन् पैसे आणण्यासाठी दबाव...

लग्नावेळी हवं तेवढे मानपान मिळालं नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विशाखाला त्रास दिला जात होता. माहेरून दागिने आणि पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने तिच्यावर दबाव टाकला जात होता. तसेच घराबाहेर कोणाशी बोलली तरी मारहाण केली जात असल्याचा आरोप विशाखाच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशाखा शिंदे आणि डॉक्टर नितीन तिळकर यांचा विवाह ३० एप्रिल रोजी झाला होता. लग्नाआधी दोघांमध्ये चांगले संबंध होते. तोपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. मात्र लग्नानंतर परिस्थिती बदलल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशाखाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली. माहेराहून सोनं आणि पैसे आणण्याची वारंवार मागणी केली जात असल्याचा आरोप आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Dhule News :अतिक्रमण हटवण्यास मनपाची टाळाटाळ; तरुणाच्या संपूर्ण परिवाराने उचललं धक्कादायक पाऊल, मनपात खळबळ

विशाखावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले...

विशाखाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पती नितीन तिळकर याने घराबाहेर आणि घरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, असा आरोप करण्यात आला आहे. ती कोणाशी बोलताना दिसली तर घरी आल्यानंतर तिला मारहाण केली जात होती. दोन दिवसांपूर्वी एका शेजारी महिलेसोबत बोलल्याच्या कारणावरून विशाखाला मारहाण करण्यात आली होती. यानंतर तिने घरात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विशाखा हिने आपल्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला होता. आई-वडील तिला माहेरी आणण्याच्या तयारीत असतानाच विशाखाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. या प्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिसांनी विशाखाला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती डॉक्टर नितीन तिळकर, सासू छाया तिळकर, दीर निनाद तिळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर पती नितीन तिळकर याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.