
अमजद खान
गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तब्बल 5 दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुजरामधील 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीतून वांगणीत वास्तव्यास आलेल्या एका महिलेचा अल्पवयीन मुलगा 1 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनसाठी गेला होता. तिथून तो गायब झाला. त्यामुळे त्याच्या बरोबर नक्की काय झाले आहे याची चिंता त्याच्या कुटुंबीयांना लागून राहीली होती.
मात्र गुजरातमध्ये तीन जणांनी त्याचं अपहरण केलं होतं. त्यानंतर फोनवरून त्याच्या आईकडे 12 लाख रूपयांची मागणी अपहरण करणाऱ्यांनी केली. संबंधित महिला या फोन मुळे घाबरून गेली होती. पुढे काय करावे हे तिला सुचत नव्हते. जर पैसे दिले नाहीत तर मुलाला काही तरी होईल याची भिती तिला होता. पण तिने धीर सोडला नाही. शेवटी त्यांनी थेट बदलापूर ग्रामीण पोलिस स्थानक गाठलं. त्यांनी झालेली घटना पोलिसांना सांगितली.
नक्की वाचा - Dhule News: भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात असं काय घडलं?
घटनेचं गांभिर्य लक्षात घेता पोलिसांना तातडीने तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरली. मोबाईल सीडीआरच् तपासण्यात आले. त्यानंतर त्या आधारे पोलिसांची एक टीम गुजरातच्या दिशेनं रवाना केली. तसेच गुजरात पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला. शिवाय अपहरणाची माहिती गुजरात पोलिसांना देण्यात आली. सीडीआरच्या माध्यमातून पोलिसांना त्या अपहरण करणाऱ्यांचा सुगावा लागला होता. त्यामुळे त्याची कल्पना गुजरात पोलिसांना देण्यात आली.
त्या आधारे गुजरात पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. घाबरलेल्या आरोपींनी अपहरण केलेल्या अल्पवयीन तरूणाची सुटका केली. मात्र सुटका होताच घाबरलेल्या त्या अल्पवयीन तरुणाने मोबाईलमधील सिमकार्ड बदलल्यानं त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी IMEI नंबरवरून त्याच्या नव्या नंबरला ट्रेस करत त्याला शोधून काढलं. त्यानंतर त्याला आईच्या ताब्यात देण्यात आलं. आरोपी अनिल खैर, नरेश खैर, लक्ष्मण खैर हे तिघं आरोपी आहेत. यामध्ये अनिल आणि नरेश सख्खे भाऊ आहेत. तर लक्ष्मण हा त्यांच्या चुलत भाऊ आहे. ज्या अल्पवयीन मुलाच्या या लोकांनी अपहरण केले होते ते ओळखीचे आहेत असं सहाय्यक पोलीस निरिक्षक गोविंद पाटील यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world