सात वचनांचा पतीला पडला विसर, जेवणावरून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण; रागाने गाठले टोक 

पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून झाले कडाक्याचे भांडण... दोघांमधील या वादाने टोक गाठले...

Advertisement
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती 

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. क्षुल्लक वादाचे रुपांतर थेट हत्याकांडमध्ये झाल्याने परिसरामध्येही खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण करत मरणासन्न अवस्थेमध्ये विहिरीमध्ये ढकलून तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीतील खरपी शिवारामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शारदा विनोद युवने (वय 37 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती विनोद सम्मू युवने (वय 33 वर्ष) या अटक करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा : दारूच्या नशेत आईला केली शिवीगाळ, मित्रांचा झाला संताप; अन्...)

महिलेच्या आईने नोंदवली तक्रार

मृत महिलेची आई विजया श्रीराम सलाडे यांनी आरोपीविरोधात शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार 16 मे रोजी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. 18 मेपर्यंत आरोपी विनोद युवनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माहितीनुसार, विनोद आणि शारदा यांचा प्रेमविवाह झाला होता. खरपी शिवारातील एका शेतामध्ये विनोद सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

14 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकावरून त्याने पत्नी शारदासोबत वाद घातले. भांडणादरम्यान त्याने पत्नी शारदाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. बेदम मारहाणीमुळे शारदाची अवस्था मरणासन्न झाली. याच अवस्थेत विनोदने तिला शेतातील विहिरीमध्ये फेकले. पाण्यामध्ये बुडून शारदाचा मृत्यू झाला. हा प्रकार शेत मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिरसगाव कसबा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह विहिरीबाहेर काढून पोस्टमार्टेमसाठी पाठवला.  

(नक्की वाचा: मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?)

यापूर्वीही दिली होती जीवे मारण्याची धमकी

"विनोद सतत मारहाण करत असतो. तसेच तो जीवे मारण्याचीही धमकी देतो", असे शारदाने आपल्या आईला फोनवर सांगितले होते. दरम्यान तक्रार आणि शवविच्छेदन अहवालामधील माहितीनुसार पोलिसांनी आरोपी विनोद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

(नक्की वाचा: कर्ज फेडण्यासाठी नातवाने उचलले टोकाचे पाऊल, 80 वर्षीय आजीविरोधात रचला गंभीर कट)

Topics mentioned in this article