शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati Conversion Case: अमरावतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांच्या शिष्यांचे बळजबरीने मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप आहे. या पीडित तृतीयपंथीयांनी भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
अमरावती येथील रेणुका किन्नर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा असलेल्या महामंडलेश्वर माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांची शिष्या किंजल पाटील (वय 27) यांचे मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 3 जुलै 2025 रोजी अमरावतीतील साबणपुरा येथे राहणाऱ्या रफिक हाजी उर्फ सोनाबाई यांच्या माध्यमातून अचलपूर येथे हे बळजबरीचे धर्मांतरण घडवण्यात आल्याचा नंदागिरी यांचा आरोप आहे.
नंदागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक हाजी उर्फ सोनाबाई, परवीन जान आणि छोटू उर्फ ममता या लोकांनी त्यांचा 'ब्रेन वॉश' करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले. यानंतर, त्यांना अचलपूर येथे नेऊन एका डेऱ्यात मुस्लिम धर्मातील विधीनुसार बळजबरीने 'कलमा' वाचायला लावून धर्मांतरण करण्यात आले आणि त्रासही देण्यात आला.
( नक्की वाचा : Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट )
इतकंच नाही, तर नंदागिरी यांच्या सहकारी शिष्या आम्रपाली चौधरी यांच्यावरही धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
हा संपूर्ण प्रकार उघडकीस येण्यापूर्वीच, अमरावतीच्या निंभोरा भागात राहणाऱ्या 20 तृतीयपंथीयांनी या संदर्भात 5 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांकडून या गंभीर प्रकरणात 'अक्षम्य दुर्लक्ष' झाल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
महामंडलेश्वरांचे 'घरवापसी' आणि जीवाला धोका
महामंडलेश्वरांचे 'घरवापसी' आणि जीवाला धोकाधर्मांतरामुळे होणारा त्रास वाढल्याने, माँ मातंगी नंदागिरी यांनी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रयागराज येथे त्यांचा 'पट्टाभिषेक' करण्यात आला.
पण, हिंदू धर्मात परतल्यानंतरही रफिक हाजी उर्फ सोनाबाई या व्यक्तीकडून त्यांना त्रास देणे सुरूच आहे. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत, नंदागिरी यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये मिस्ट्री' रॅगिंग! चौकशी झाली, आरोप नाकारले... मग तक्रार का गेली? )
खासदारांकडे धाव आणि 'रॅकेट'चा आरोप
पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे, महामंडलेश्वर नंदागिरी आणि त्यांच्या सहकारी किन्नर आखाड्याच्या सदस्यांनी (ज्यात आम्रपाली चौधरी, मोगली उंटवाल, खुशी शहा, गौरी पवार, किंजल पाटील, तनु भोसले, मंगला ठाकूर, खुशबू बारस्कर, आनंदी केळकर, मधु करमकर, अंबिका चौधरी, निकिता वाघमारे, सविता विश्वकर्मा, राजकुमार नावानी, डिंपल चौधरी, रोहिणी कांबळे, पूनम पंडित, बबली चौधरी आणि विशाखा पाटील यांचा समावेश आहे) थेट भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या कार्यालयात धाव घेतली.
या प्रकरणात अनिल बोंडे यांनी सांगितले की, हा संपूर्ण प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. किन्नरांचे अवैध धर्मांतरण करणे आणि त्यांचा अवैध व्यवसायासाठी वापर करण्याचे एक मोठे 'रॅकेट' अमरावतीत सक्रिय आहे. ज्या तृतीयपंथीयांचे धर्मांतरण करण्यात आले, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. काही तृतीयपंथीयांवर जीवघेणे हल्ले देखील करण्यात आले आहेत आणि याकडे राजापेठ पोलिसांनी देखील अक्षम्य दुर्लक्ष केले आहे."
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून मागणी करणार असल्याचे बोंडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, या गंभीर प्रकरणावर पोलीस आता काय कारवाई करतात याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.