Amravati News: अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत झालेल्या रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोषी ठरलेल्या तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे येथील रहिवासी असलेल्या रितेश मेश्राम यांचा मृत्यू 5 जून 2024 रोजी पोलिसांच्या ताब्यात असताना झाला होता. रितेशला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. रितेशचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर, कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा आणि चुकीच्या वर्तणुकीचा थेट आरोप केला होता व न्यायाची मागणी केली होती.
( नक्की वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार; 'हवामहल' खंडणीतून उभारला? नवा खळबळजनक आरोप )
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनुसूचित जाती आयोगाने (SC Commission) स्वतः हस्तक्षेप करत सखोल चौकशी केली. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या वर्तणुकीमुळे रितेशचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आयोगाने काढले आणि त्यानंतर न्यायालयासमोर अहवाल सादर केला.
न्यायालयीन चौकशी अहवालात गार्ड इंचार्ज आणि गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलीस अंमलदारांना रितेश मेश्राम यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरविण्यात आले. कोर्टाच्या आदेशानंतर अखेर काल, 2 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस अधिकाऱ्यासह आठ अंमलदारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खुनाचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
निलंबित झालेले पोलीस कर्मचारी
खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने कारवाई करत आठही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
- राजकुमार मुलामचंद जैन
- विशाल मुकुंदराव रंगारी
- अश्विनी शामरावजी आखरे
- सरिता वैद्य
- प्रविण रामदास मेश्राम
- अलीम हकीम गवळी
- अमोल अमृतराव घोडे
- प्रशांत ढोके
तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.