योगेश शिरसाट, प्रतिनिधी
ACB Trapped ZP Teacher In Akola : जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका शिक्षकाला अटक केली आहे. शैलेंद्र तुळशीराम बगाटे (43) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. बगाटे खासगी शिक्षक असून ते व्यवसाय एजंटही आहेत. अकोल्याच्या खदान येथील कैलास टेकडी येथील ते रहिवासी आहेत. शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या बदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर एसीबीने सापळा रचून आज 17 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही कारवाई केली.
अनेक महिने उलटूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने 13 जून 2025 रोजी आंतरजातीय विवाह केला असून शासनाच्या योजनेनुसार पात्र जोडप्याला 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.या अनुदानासाठी तक्रारदाराने 2 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद,अकोला येथील समाजकल्याण विभागात सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता.परंतु, अनेक महिने उलटूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही.याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार समाजकल्याण विभागात गेले असता तेथे उपस्थित असलेल्या शैलेंद्र बगाटे यांनी काम करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास नकार असल्याने तक्रारदाराने 17 डिसेंबर 2025 रोजी अकोल्याच्या एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली.
नक्की वाचा >> Video: पतीने स्कूटरमध्ये लावलेल्या GPS ट्रॅकरमुळे पत्नीचं कांड आलं समोर! एका क्षणात 15 वर्षांचा संसार मोडला
एसीबीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोपीला पकडलं
जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाच्या तक्रारीनुसार, एसीबीने शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली.त्यावेळी आरोपीने पहिल्या टप्प्यात 3 हजार रुपये स्वीकारण्याची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित 2 हजार रुपये नंतर घेण्याची तयारी दर्शवली होती.त्यानंतर एसीबीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आरोपीने 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडले.
नक्की वाचा >> "पप्पा माझा बॉयफ्रेंड आहे..", इंटरकास्ट असल्याने 11 वर्षांनी सांगितलं, रडणाऱ्या लेकीला बापाने जे उत्तर दिलं..
या प्रकरणी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली,जिल्हा अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई अमरावती परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी अकोला पथकाने केली असून,कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.