दिल्लीच्या कथित मद्यविक्री घोटाळ्यात अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर दिल्लीच्या उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 20 जून रोजी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्या विरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध केला होता. ईडीने दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ट्रायल कोर्टाचा आदेश हा एकतर्फी आणि चुकीचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला 21 जूनला स्थगिती दिली होती. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली होती.
ईडीच्या मते केजरीवाल या सर्व कथित मद्यविक्री घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळं आता या सर्व प्रकरणात नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाच आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना अंतरीम जामीन...
दरम्यान न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या दोन सदस्यीय पीठाने अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात 12 जुलैला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. जोपपर्यंत या प्रकरणाची सुनावणी मोठं खंडपीठ पूर्ण करत नाही तोपर्यंत केजरीवाल अंतरिम जामीनावर असणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची आवश्यकता होती का हा प्रश्न मोठ्या न्यायपीठाकडे वर्ग करण्यात आला असून तीन न्यायाधीशाच्या पिठापुढे ही सुनावणी होणार आहे.
नक्की वाचा - जामीन मंजूर, मात्र तुरुंगातून सुटका नाही; अरविंद केजरीवाल प्रकरणात महत्त्वाची अपडेट!
अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला ईडीने अटक केली होती. ईडीच्या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 10 मे ते 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी 2 जूनला स्वत: आत्मसमर्पण केलं होतं.
दरम्यान 20 जून रोजी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. मात्र, ईडीने दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ट्रायल कोर्टाचा आदेश हा एकतर्फी आणि चुकीचा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला 21 जूनला स्थगिती दिली होती.
केजरीवाल यांचा मुक्काम कारागृहातच..
केजरीवाल यांची कारागृहातून न्यायालयीन लढाई सुरु असताना 26 जून रोजी सीबीआयने केजरीवाल यांना अटक केली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मिळाला असला तरी केजरीवाल कारागृहातून बाहेर येणार नाहीत. कारण केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात अजूनही जामीन मिळालेला नाही.