सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat Banking Scam: नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोककुमार खरात याच्या पापकर्मांचा पाढा आता बँकांच्या खात्यांपर्यंत पोहोचला आहे. श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या खरातने चक्क 130 पेक्षा अधिक बँक खात्यांचे जाळे विणले होते. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांमध्ये खातेधारक वेगळे असले, तरी त्यांचा वारसदार म्हणजेच 'नॉमिनी' म्हणून स्वतः अशोक खरातचेच नाव होते. अहिल्यानगर पोलिसांनी या आर्थिक व्यवहारांचा तपास आता अधिक तीव्र केला आहे.
खातेधारक दुसरेच पण मालक खरात
अशोक खरातने आपल्या नातेवाईकांच्या आणि परिचितांच्या नावावर विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये ही खाती उघडली होती. मात्र, या सर्व खात्यांचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवण्यासाठी त्याने चलाखीने स्वतःचे नाव नॉमिनी म्हणून लावले होते. याचा अर्थ असा की, त्या खात्यांमधील पैशांवर प्रत्यक्ष ताबा खरातचाच होता. या खात्यांमधून नेमकी किती रक्कम फिरली आणि हे पैसे कुणाचे होते, याचे गुपित आता हळूहळू उलगडू लागले आहे.
( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
पतसंस्थांमधील खात्यांचा सुळसुळाट
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत खरातने 57 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर तब्बल 100 खाती उघडली होती. या शंभरही खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरातचेच नाव आहे. या खात्यांमधून आतापर्यंत सुमारे 60 कोटी 36 लाख रुपयांची अवाढव्य उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे. सध्या या खात्यांमध्ये 78 लाख 99 हजार रुपये शिल्लक असल्याचे समजते. केवळ एकाच पतसंस्थेत इतकी मोठी रक्कम फिरल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
सिन्नर कनेक्शन आणि कोट्यवधींचे व्यवहार
खरातचे जाळे केवळ राहातापुरते मर्यादित नव्हते. सिन्नर येथील जंगम नागरी पतसंस्थेतही त्याने 32 जणांच्या नावावर खाती उघडली होती. या खात्यांमधून सुमारे 2 कोटी 74 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या पतसंस्था आणि बँकांमध्ये नातेवाईकांच्या नावाचा वापर करून खरातने एकूण 130 पेक्षा जास्त खाती हाताळली आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःलाच वारसदार म्हणून घोषित केले होते.
( नक्की वाचा : Ashok Kharat : 'कुणावरही जबरदस्ती केली नाही, जे केलं ते...'; भोंदू खरातने पोलिसांना काय सांगितलं? वाचा सविस्तर )
सावकारी, जमीन बळकावणे आणि आता हे बनावट खात्यांचे मोठे आर्थिक जाळे समोर आल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर व व्यापक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहिल्यानगर पोलीस सध्या या सर्व खात्यांचा तांत्रिक तपास करत असून आर्थिक गुन्हे शाखाही यामध्ये सक्रिय झाली आहे. खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांनी मिळून हे आर्थिक साम्राज्य उभे केल्याचा संशय आहे. येणाऱ्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची आणि नवीन आर्थिक घोटाळे बाहेर येण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world