Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या खात्यात कोट्यवधींची उलाढाल; पण सह्या कुणाच्या? तपासात नवा ट्विस्ट

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातच्या कथित आर्थिक साम्राज्याचा तपास आता एका अत्यंत वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ashok Kharat Case : या प्रकरणाला आता एक नवा ट्विस्ट मिळाला आहे.
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Ashok Kharat Case : शिर्डीतील जमीन फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरातच्या कथित आर्थिक साम्राज्याचा तपास आता एका अत्यंत वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे समोर येत असून, तपासाची सुई आता थेट नामांकित पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारांकडे वळली आहे. विशेषतः समता पतसंस्थेतील संशयास्पद खात्यांमुळे या प्रकरणाला आता एक नवा ट्विस्ट मिळाला असून, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे गूढ अधिकच गडद झाले आहे.

132 खाती आणि 60 कोटींच्या व्यवहारांचा संशय

शिर्डी पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत सुमारे 132 वेगवेगळ्या नावांनी खाती उघडण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व खात्यांचा संबंध थेट अशोक खरातशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Advertisement

धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेक खात्यांना एकच मोबाईल क्रमांक लिंक असल्याचेही उघड झाले आहे. कोपरगाव येथील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतून सुमारे 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या मोठ्या रकमेचा स्त्रोत नेमका काय आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
 

नामकर्ण आवारेंचा खळबळजनक जबाब

या प्रकरणातील महत्त्वाचे दुवे शोधण्यासाठी पोलिसांनी नामकर्ण आवारे यांची सुमारे 2 तास कसून चौकशी केली. मात्र, आवारेंनी दिलेला जबाब ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत. संबंधित खाती, त्यावरील स्वाक्षऱ्या आणि झालेल्या कोट्यवधींच्या व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 

आपण कधीही खाते उघडण्यासाठी संस्थेत गेलो नाही आणि त्यावरील सह्या आपल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. इतकेच नाही तर, इतर काही खातेधारकांनीही पोलिसांशी संपर्क साधून ही खाती आपली नसल्याचा दावा केल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( नक्की वाचा : Ashok Kharat :130 बँक खाती, 60 कोटी अन् 'वारस' मात्र एकच! भोंदू खरातचा बँकिंग विश्वातील मोठा घोटाळा उघड )

पतसंस्थेचा दावा आणि पोलिसांचे प्रश्न

दुसरीकडे, समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी मात्र सर्व खाती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि केवायसी कागदपत्रांची पूर्तता करूनच उघडल्याचा दावा केला आहे. आवारेंनी केलेल्या आरोपांनंतर आता पोलीस अर्जावरील सह्या नेमक्या कोणाच्या आहेत, केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण झाली आणि रोख रक्कम काढण्याच्या स्लिपा कोणी भरल्या, या प्रश्नांची उकल करणार आहेत. यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाची आणि अध्यक्ष काका कोयटे यांचीही लवकरच चौकशी केली जाणार आहे.

Advertisement

आरोपींच्या कोठडीत वाढ

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या आर्थिक घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या किरण सोनवणे आणि अरविंद बावके यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी 3 दिवसांची वाढ केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी कल्पना खरात अजूनही फरार असून पोलीस तिचा आणि अशोक तांबे यांचा कसून शोध घेत आहेत. कोरोनानंतरच्या काळात या पतसंस्थेच्या ठेवींमध्ये झालेली 500 कोटींची वाढ आणि वाढलेले 50 हजार ठेवीदार आता संशयाच्या भोवऱ्यात आले असून सहकार विभागामार्फतही चौकशीची मागणी केली जात आहे.

Topics mentioned in this article