जाहिरात

Akola News: हातोड्याने काचा फोडल्या, जीवे मारण्याची धमकी; अकोल्यात शिवसेना शहरप्रमुखावर हल्ला, कारण काय?

Akola News: कराळे हे आगर गावातून आपले काम आटोपून परतले असताना, त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या बोलेरो कारला लक्ष्य करण्यात आले.

Akola News: हातोड्याने काचा फोडल्या, जीवे मारण्याची धमकी; अकोल्यात शिवसेना शहरप्रमुखावर हल्ला, कारण काय?
Akola News: अकोला पोलिसांनी या गंभीर प्रकरणात तातडीनं कारवाई केली.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News: अकोला शहरात राजकीय वातावरण तापवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख राहुल सुरेश कराळे यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (1 मार्च 2026) रात्री 9.40 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

कराळे हे आगर गावातून आपले काम आटोपून परतले असताना, त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या बोलेरो कारला लक्ष्य करण्यात आले. मोटारसायकलवरून आलेल्या काही तरुणांनी थेट वाहनावर हल्ला चढवला, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हातोड्याने काचा फोडल्या आणि जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कराळे आपल्या घरापाशी पोहोचले असता दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. एका आरोपीने हातातील हातोड्याने गाडीच्या काचा फोडल्या, तर इतरांनी वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी कराळे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लोकांचा जमाव जमा होत असल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली.

( नक्की वाचा : Pune News आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )

काय आहे कारण?

या गंभीर घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमान्वये (378/2026, 109(1), 324(4), 3(5)) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले. 

हर्षल दिलीप मंडलीक, चेतन विजय खंडारे, सागर संतोष इंगळे आणि वैभव दिनेश गोपनारायण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस चौकशीत या आरोपींनी जुन्या वादातून हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात कोणत्याही प्रकारचे अग्नीशस्त्र किंवा तलवारीचा वापर झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Akola News: 48 लाखांचा डिजिटल दणका! डॉलरच्या बदल्यात बड्या व्यापाऱ्याला गंडा, अकोल्यातील धक्कादायक प्रकार )
 

अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मालती कायटे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना बेड्या ठोकल्या. 

राजकीय व्यक्तीच्या वाहनावर हल्ला झाल्याने शहरात मोठी चर्चा सुरू होती, मात्र पोलिसांनी दोन तासांत आरोपींना पकडल्याने प्रशासनाचे कौतुक होत आहे. या घटनेमागे केवळ जुने वैमनस्य आहे की आणखी काही राजकीय कारण आहे, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com