बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं, बाथरूममध्ये 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?

सामाजिक काम करणाऱ्या आश्रमात एका तरूणीचा खून होणं ही बाब धक्कादायक असून पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेलं आनंदवन आश्रमात 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटस्फोटित तरुणी कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती.

तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात. 26 जून रोजी ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. काल रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घराच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. मृत तरुणीच्या गळ्यावर घाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नक्की वाचा - 108 आदिवासी महिला, बचत गटाची स्थापना अन् लाखोंचं कर्ज; पालघरच्या महिलांसोबत काय घडलं?

या घटनेनंतर आनंदवनात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन हा आश्रम बाबा आमटेंनी केलेल्या कामासाठी ओळखला जातो. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी हा आश्रम उभा केला. आतापर्यंत या आश्रमाने हजारो कुष्ठरोगी आणि वृद्धांना आसरा दिला. अशा सामाजिक काम करणाऱ्या आश्रमात एका तरूणीचा खून होणं ही बाब धक्कादायक असून पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.