प्रतिनिधी, मनोज सातवी
पालघर जिल्ह्यातल्या मनोर येथील एका महिलेने तब्बल 108 आदिवासी महिलांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाने आरोपी महिलेने अनेक आदिवासी महिलांच्या नावावर कर्ज काढले. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे या महिलांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
या आरोपी महिलेचं नाव सुमय्या यासर पटेल असून ती फरार झाली आहे. लाखो रुपयांचं कर्ज कसं फेडायच, असा प्रश्न या आदिवासी महिलांसमोर उभा राहिला आहे. सुमय्या पटेल या महिलेने आदिवासी महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या नावावर पालघर जिल्ह्यातील वाडा, मानोर, विक्रमगड तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणच्या खासगी बँका, पतसंस्थांकडून कर्ज काढले.
बचत गट स्थापन करून तुम्हाला उत्पन्नाचे साधन मिळवून देते असं म्हणत सुमय्या पटेल हिने तब्बल 108 महिलांच्या नावावर वाडा, पालघर, मनोर भागातील तसेच, जिल्ह्याबाहेरील खासगी बँका, पतसंस्थांकडून महिलांच्या नावावर कर्ज काढले आहे. त्यासाठी या अशिक्षित आदिवासी महिलांची कागदपत्रं, फोटो वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा केली आहेत. त्यासाठी कर्ज प्रकरणावर महिलांच्या सह्या, अंगठे घेऊन या आदिवासी महिलांना गट बनवा असं सांगत प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देत एका महिलेच्या नावावर तीन - चार किंवा अनेक वेळा कर्ज काढले आहे. मात्र या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे संबंधित बँकेचे अधिकारी या महिलांच्या घरी तकादा लावत असल्याने महिलांना जगणं कठीण झाले आहे.
नक्की वाचा - ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच धोका, रिल्स स्टार युगुलाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल
याप्रकरणी महिलांनी पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन तक्रार अर्ज देत न्यायाची मागणी केली आहे. यावेळी योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करू असे म्हणत अशा कोणाच्याही अमिषाला बळी पडू नका, कोणताही निर्णय घेण्या अगोदर योग्य माहिती घ्या, असं आवाहन पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
सुमय्या पटेल या महिलेने आदिवासी अशिक्षित महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पतसंस्था, खासगी बँकांचे कर्मचारी यांच्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणात कशा पद्धतीने करवाई करतात हे पाहणे महत्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world