Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर गंभीर शब्दांत टीका

Badlapur Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर करण्यात येत आहे.

Advertisement
Read Time: 4 mins

Badlapur Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीमध्ये मृत्यू झाला आहे. सोमवारी ( 23 सप्टेंबर) ही घटना घडली आहे. बदलापुरातील एका प्रसिद्ध शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षयने लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली होती. बदलापूरकरांनी मोठे आंदोलन देखील पुकारले होते. आंदोलनादरम्यान अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी करण्यात आली. 

या घडामोडींदरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे वृत्त समोर आले आहे. दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. 

शरद पवार, अध्यक्ष, राशप :

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे. 

(नक्की वाचा: 'असा न्याय अपेक्षित नव्हता', अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर पीडित चिमुरडीचे वकील असं का म्हणाले?)

डॉ. अमोल कोल्हे, खासदार : 

केवळ एका 'एन्काऊंटर'ने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धूळफेक आहे. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात २१३ माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत.बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालढकल, इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणे ही पार्श्वभूमी देखील आहे. बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.


विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते :

याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!

अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का??
अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?
आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? 

बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..
बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही.

आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!

(नक्की वाचा: Akshay Shinde Encounter : 'जैसे ज्याचे कर्म तैसे...' राज ठाकरेंच्या नेत्यांनं केलं ठाणे पोलिसांचं अभिनंदन)

नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष :

बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. 
शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. 
या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 

१. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?
२ . फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ? 
३. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? 
या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.


जितेंद्र आव्हाड, आमदार, राशप:

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच ३ गोष्टी घडल्या.

१. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर
२. पोलिसांवर दबाव
३. शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न

या सगळ्या नंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपित माहीत होते का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे.

हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू करा..!

विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही आहोत. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे, आणि यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर ९० दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत Political Heroism आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे.

महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही.

(नक्की वाचा : Exclusive : एन्काऊंटरच्या 4 तासांपूर्वी अक्षयची आई-वडिलांशी भेट, लेकाच्या मृत्यूनंतर पालकांची पहिली प्रतिक्रिया)

Badlapur | Akshay Shindeच्या Encounterनंतर बदलापुरात फटाके फोटत आनंद साजरा