Akshay Shinde Encounter : बदलापुरातील (Badlapur News) प्रसिद्ध शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार केलेला आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचा दावा केला जात आहे. ठाणे आयुक्तालयात तब्बल 16 वर्षांनी एन्काऊंटरची घटना घडल्याचं समोर आलं आहे. एकेकाळी एन्काऊंटरसाठी प्रसिद्ध असलेलं ठाणे आयुक्तालय (Thane Commissionerate) याच कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2008 साली बंटी पांडे टोळीच्या जितू यादव या गुंडबरोबर झालेल्या शेवटच्या चकमकीनंतर आतापर्यंत संपूर्ण ठाणे पोलीस पोलीस आयुक्तालयात कोणतीही चकमकीची घटना घडली नव्हती.
ठाणे पोलीस आयुक्तालयात 6 डिसेंबर 2008 साली बंटी पांडे टोळीच्या जितु यादव या गुंडासोबत शेवटची चकमक झाली होती. या गुंडावर तब्बल 17 विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. ठाणे खंडणी विरोधी विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ आणि त्यांच्या पथकाने घोडबंदर परिसरात झालेल्या चकमकीत जितु यादव याचा खात्मा केला होता. त्यावेळी जिगरबाज अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या मदन बल्लाळ यांना यादव याने झाडलेली गोळीही लागली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परंतु सुदेवाने बल्लाळ यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घातले असल्याने ते थोडक्यात बचावले. यानंतर सोमवारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूपर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या बंदुका या म्यानच होत्या. या 15 वर्षे 9 महिन्याच्या काळात संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात एकाही चकमकीची नोंद झालेली नव्हती. यापूर्वी रवींद्र आंग्रे घुले, प्रफुल्ल जोशी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी संघटीत टोळ्यांचं वर्चस्व मोडून काढले होते. ठाणे पोलीस आयुक्तालयात एकेकाळी संघटीत टोळ्यांच मोठं वर्चस्व होतं. या गुंडाच्या दहशतीने नागरिक हैराण झाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे 2000 साली तर संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात खंडणीच्या तब्बल 210 तक्रारी दाखल होत्या. त्यातही या काळात अखंड अशा ठाणे जिल्ह्यात सुरेश मंचेकरच्या टोळीने तर धुमाकूळ घातलेला.
नक्की वाचा - Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?
कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर ते अगदी वसई विरार पट्ट्यात मंचेकर टोळीचे खंडणीसाठी फोन जात होते. व्यापारी आणि नागरिक मोठ्या दहशतीखाली होते. जोडीला छोटा राजन, दाऊद, छोटा शकील, हेमंत पुजारी, रवी पुजारी, अमर नाईक टोळीच्या गुंडाचे खंडणीसाठी व्यापाऱ्यांना आणि बांधकाम व्यावसायिकांना फोन जात. त्यांची मोठी दहशत या वर्गात पसरली होती. या सर्वांचं वर्चस्व मोडून काढण्याच आवाहन ठाणे पोलिसांसमोर उभ होतं.
त्यानुसार ठाणे पोलीस दलातील रविंद्र आंग्रे, दत्ता घुले, केलाश डावखर, प्रफुल्ल जोशी, चंद्रकांत जोशी आदी जिगरबाज अधिकाऱ्यांनी हे आवाहन लिलया पेललं होतं. यात सर्वात मोठी दहशत असलेल्या सुरेश मंचेकर टोळीच्या मागे ठाणे खंडणी विरोधी पथक लागलं होतं, त्यानुसार या टोळीचा म्होरक्या सुरेश मंचेकर याचा मागोवा काढत रविंद्र आंग्रे यांच्या पथकाने 15 ऑगस्ट 2003 साली त्याला कोल्हापूर येथे चकमकीत ठार केलं. याशिवाय छोट्या गण्या या छोटा राजन टोळीतील अत्यंत खतरनाक गुंडाचा त्याच्या तीन साथीदारांसह येउर येथे आंग्रेंनी खात्मा केला होता. ठाणे पोलीस आयुक्तालयात रविंद्र आंग्रे यांच्या नावावरच सर्वाधिक 23 चकमकींची नोंद आहे. त्यांच्या शिवाय दत्ता घुले केलाश डावखर, प्रफुल्ल जोशी, चंद्रकांत जोशी या अधिकाऱ्यांच्या नावावरही चकमकींची नोंद आहे. यातील डावखर यांनी तर उल्हासनगर येथे एकाचवेळी सात दरोडेखोरांचा खात्मा केला होता.
नक्की वाचा - Exclusive : एन्काऊंटरच्या 4 तासांपूर्वी अक्षयची आई-वडिलांशी भेट, लेकाच्या मृत्यूनंतर पालकांची पहिली प्रतिक्रिया
मधल्या काळात रवी पुजारी आणि हेमंत पुजारी टोळीच्या काही गुंडांबरोबरच दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली होती. यात इक्बाल कासकर आजही तुरुंगातच आहे.