बदलापूर प्रकरण: संस्थाचालकांना 44 दिवसानंतर अटक, आज कोर्टात नेणार, अटकेचा A TO Z थरार

मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
बदलापूर:

निनाद करमकर

बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. कर्जत परिसरातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरीत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांना आज कल्याण कोर्टात हजर केले जाईल.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

चोविस तासात पोलिसांनी घेतलं ताब्यात 

बदलापुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार झाले होते. या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र 10 सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला. नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. पोलिसांच्या कारभारावर ही कडक शब्दात ताशेरे ओढले. 

ट्रेंडिंग न्यूज - LIVE UPDATE: बदलापूर प्रकरणातील अटक संचालकांना कोर्टात हजर करणार

पोलिसांची मध्यरात्री कारवाई 

"पोलीस आधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाहीत. इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेच सापडतात, मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत?" असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मात्र अवघ्या 24 तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना अटक केली. यानंतर त्यांना आधी उल्हासनगरच्या एसीपी कार्यालयात नेण्यात आलं. तिथून मध्यरात्री 1 वाजता त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं. यावेळी आरोपींच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी धक्काबुक्की करत चित्रीकरण करण्यापासून सुरुवातीला मज्जाव केला. तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 20 ते 25 पोलिसांचा ताफा आरोपींच्या संरक्षणासाठी उभा करण्यात आला. 

ट्रेंडिंग बातमी - '50 जणांना पाडणार' यादी तयार, टोपे, पवार,पाटील यांच्यासह यादीत कोणा कोणाची नावं?

पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलीसच बनले डमी आरोपी?

दरम्यान, ज्यावेळी या 2 आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी चक्क डमी आरोपी बसवून एक गाडी रुग्णालयात पाठवली आणि त्यानंतर मागच्या गेटने खऱ्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणलं. पोलिसांच्या गाडीत बुरखा घालून बसलेले डमी आरोपी हे दुसरे तिसरे कुणी नव्हे, तर खुद्द पोलीस कर्मचारीच होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनीच पत्रकारांना दिली.

ट्रेंडिंग बातमी - मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?

उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याने रुग्णालयात दाखल

मध्यवर्ती रुग्णालयात मध्यरात्री 1 वाजता पासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत असे तब्बल 3 तास उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना मध्यवर्ती रुग्णालयातच पोलिसांच्या निगराणीत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुरुवारी या दोघांनाही कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.