विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलेले दिसतोय. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचवासाठी मैदानात आहे. जरांगे यांनी आधीच विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडणार ही घोषणा केली आहे. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 50 उमेदवार पाडणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय ज्या पन्नास जणांना पाडायचे आहे त्यांची यादीही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या यादीत कोणा कोणाची नावे आहेत हे ही त्यांनी सांगून टाकले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
राज्यकर्त्यांना ओबीसी नेत्यांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. जो तरूण ओबीसी नेता पुढे येत आहे, त्यांना कोणी महामंडळ, तर कुणाला विधान परिषद देवून शांत करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. पण जे प्रस्थापित आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही. उलट जो समाज पन्नास ते साठ टक्के आहे त्यांची भिती शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना वाटली पाहीजे असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले आहे. ती भिती आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला NDTV मराठीच्या हाती, कोणाच्या वाट्याला किती जागा?
त्यासाठी ओबीसी समाज 50 जणांना पाडणार आहे. कोणाला पाडायचे आहे ते ही ठरले आहे. त्यांच्या नावाची आणि मतदार संघाची यादीही तयार झाली आहे असेही हाके यावेळी म्हणाले. ज्यांनी जरांगेना पाळलं, पोसलं, त्यांना गाड्या पुरवल्या. पैसे पुरवले. त्यांना लेखी आश्वासनं दिली अशा सर्वांना या निवडणुकीत पाडणार असल्याचे हाके यांनी सांगितले. त्यांची यादी तयार आहे. त्यात कोणाची नावे आहेत तेही हाके यांनी सांगितले. राजेश टोपे, रोहित पवार, रोहीत पाटील यांची थेट नावेच हाके यांनी घेतली.
आम्ही सांगू तेच उमेदवार द्या. त्यांना आम्ही निवडून आणू असेही हाके या निमित्ताने म्हणाले. या शिवाय ओबीसींची भूमीका मांडणारे पन्नास जण ही आपण विधानसभेत पाठवू असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तिसऱ्या आघाडीवरही टिका केली. मनोज जरांगे आणि संभाजी राजे हे मराठा तरूणांची माथी भडकवत आहेत. ओबीसांनी आरक्षण मिळालं म्हणून मराठ्यांचं नुकसान झालं हे चुकीच्या पद्धतीने सांगितले जात आहे असेही ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - गौतमी पाटीलच्या मनात कोणी केलं घर? थेट उत्तर देत चाहत्यांना केलं...
त्याच बरोबर सध्या देवेंद्र फडणवीस हे कसे खलनायक आहेत हे दाखवून देण्याची स्पर्धा ही मराठा नेत्यांमध्ये चालली आहे. त्यात मनोज जरांगे पाटील, शरद पवार, एकनाथ शिंदे हे पुढे असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला. हाके यांनी आता ओबीसी समाजाची भूमीका काय असणार हे स्पष्ट केले आहे. मात्र त्यात त्यांना किती साथ मिळते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर परिणामकारक ठरला होता. आता विधानसभेत मराठा की ओबीसी फॅक्टर चालणार हे पाहावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world