Badlapur News: बदलापूर पोलिसांनी 20 दिवसांपूर्वी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या एका नेपाळी नागरिकाच्या मृत्यूचे रहस्य अखेर उघड केले आहे. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती किंवा आकस्मित वाटत असला, तरी तो प्रत्यक्षात जमावाने केलेल्या मारहाणीमुळे झालेली हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
रिक्षा चोरीच्या संशयावरून काही लोकांनी मिळून केलेल्या अमानुष मारहाणीत या व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण?
बादशाह उर्फ शिवप्रसाद रविदास असे मृत पावलेल्या नेपाळी नागरिकाचे नाव आहे. 18 एप्रिल रोजी बदलापूर पश्चिम येथील मांजर्ली परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्या वेळी पोलिसांनी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला, तेव्हा पोलिसांचा संशय बळावला.
या अहवालात बादशाहच्या शरीरावर गंभीर अंतर्गत दुखापती असल्याचे दिसून आले, ज्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचे संकेत मिळाले.
( नक्की वाचा : Pune News: 4 मुली, सातवा मजला अन् नराधम सुरक्षारक्षक; 10 वर्षांच्या 'दुर्गे'मुळे टळला मोठा अनर्थ )
अशी झाली मारहाण
तपासादरम्यान पोलिसांना 17 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. बदलापूर पूर्वेतील गावदेवी परिसरात बादशाह याच्यावर रिक्षा चोरीचा संशय घेत काही स्थानिकांनी त्याला पकडले होते. त्यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला मॅक्डोनाल्ड चौक परिसरात सोडून देण्यात आले.
बादशाह वेदनांनी विव्हळत असतानाही तिथून चालत बेलवली भुयारी मार्गातून मांजर्ली परिसरातील आमदार कार्यालयाजवळ पोहोचला. मात्र, जखमा गंभीर असल्याने तिथेच तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. सलग 20 दिवस चाललेल्या या तपासानंतर मारहाणीत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय अनिकेत शेलार या तरुणाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
एका महिन्यानंतर हत्येचा उलगडा
सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या या प्रकरणाने महिनाभरानंतर हत्येचे रूप घेतल्याने बदलापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरीच्या संशयावरून कायदा हातात घेऊन एखाद्याचा जीव घेणे किती महागात पडू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांच्या चिकाटीमुळे एका परदेशी नागरिकाला न्याय मिळण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले असून, उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.