Badlapur News : बदलापुरात पत्नीचं नाक-तोंड दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. भयंकर बाब म्हणजे पतीने पत्नीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा बनाव केला. पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं तिचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.
हवे तितके पैसे घ्या अन् मुलीला घेऊन जा, योगेशची सासरच्यांना ऑफर
प्राजक्ता मेहेर असं मृत पत्नीचं नाव होतं. तिचं २०१० साली बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर सोबत लग्न झालं. त्यांना १५ आणि ११ वर्षांची दोन मुलंही आहेत. मात्र काही काळापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या पूजा मेहेर नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. यातूनच योगेशने पत्नी प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. १४ मार्च २०२६ रोही प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा, अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केला आहे. यानंतर ८ एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं. ९ एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली.
प्राजक्ताचा नाक-तोंड दाबून खून
मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जे.जे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला. याचाच रिपोर्ट २३ जून रोजी आला, ज्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली आहे. तर या प्रकरणात योगेशची प्रेयसी पूजा मेहेर, तसंच नणंद हर्षदा कोंडीलकर, कुसुम बोराडे यांनाही आरोपी करण्याची प्राजक्ताच्या कुटुंबियांची मागणी आहे. त्यानुसार तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.