Badlapur News: आली लहर केला कहर! मध्यरात्री चोरट्यांनी वाईन शॉप फोडले, महागडी दारू गटकली Video Viral

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बदलापूर:

अमजद खान 

आली लहर केला कहर असचं काहीसं बदलापूरमध्ये पाहायला मिळालं आहे. शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. यावेळची चोरी थोडी वेगळी आहे. गुरुवारी मध्यरात्री बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध वाईन शॉपवर चोरट्यांनी डल्ला मारला.'विकी वाईन्स' नावाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि महागड्या दारूच्या बाटल्या लंपास केल्या आहेत. शहरातील कात्रप परिसरातील मुख्य चौकातच हे 'विकी वाईन्स' आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिवाय या चोरीचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. चोरटे चोरी करून पसार झाले आहेत. 

नेमकी घटना काय?
कात्रपमधील मुख्य चौकात गजबजलेल्या ठिकाणी विकी वाईन शॉप आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास तीन चोरटे या दुकाना बाहेर आले. त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोणी नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांनी चोरी करण्याचे ठरवले. त्यांनी अत्यंत शिताफीने दुकानाचे शटर उचकटले. त्यातील एकाने आत प्रवेश केला. हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरट्यांनी काउंटरमधील 73 हजार रुपयांची रोकड, 3 महागडे मोबाईल फोन आणि काही विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. सकाळी मालक दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलीसांना दिली. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: एक चुक नडली अन् 7 जण लिफ्टमध्ये अडकले, 3 तास बचावासाठी धडपड, अखेर...

चोरटे सीसीटीव्हीत कैद
दुकानात चोरी झाली आहे याची खात्री मालकाला झाली होती. त्यामुळे त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत चोरीची सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. तीन चोरटे मिळून हा गुन्हा करताना स्पष्ट दिसत आहेत. एक चोर आत आला. त्यांने सर्व लॉकर चेक केले. गल्ल्यातील पैसे ही घेतले. काही वस्तू इकडे तिकडे फेकल्या. त्यानंतर त्याने आपला मोर्चा महागड्या दारूकडे वळवला. महागड्या दारूच्या बाटल्या त्यांनी लंपास केल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुख्य चौकातील दुकान फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नक्की वाचा - Raigad 10th Result: मुली नाही तर मुलांची बाजी! पोलादपूर तालुका जिल्ह्यात अव्वल, निकालाची सगळीकडे चर्चा

पोलीस तपास सुरू
याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. गजबजलेल्या रस्त्यावरील हे दुकान फोडल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याची चर्चा असून, त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी दुकान मालकांनी केली आहे. शहराच्या मुख्य भागात ही चोरी झाल्याने नागरिकांमध्ये ही चिंतेचे वातावरण आहे. पोलीसांनी असा चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. सध्या हे चोर फरार आहेत.