निनाद करमरकर, प्रतिनिधी
बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर कंत्राटी सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाला जाग आली आहे. शाळा प्रशासना शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकलं आहे. आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केलाय. शाळेनं सर्व पालकांचीही जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान या प्रकरणात संतप्त बदलापूरकरांनी मंगळवारी शहर बंदची हाक दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली!
बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं. अखेर मनसेच्या हस्तक्षेपानंतर रात्री 1 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत होता. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसंच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
बदलापूर बंदचा इशारा
या सगळ्या घटनेनंतर बदलापूर शहरातील सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकारी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. त्यातूनच मंगळवारी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी बदलापूर शहर बंद ठेवण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. या बंदला रिक्षा तसंच व्यापारी संघटनेनं पाठींबा दिला आहे.
( नक्की वाचा : नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरनं केलं भयंकर कृत्य, हॉस्पिटलमध्येच घडला सर्व प्रकार )
शाळेने चार दिवस भूमिका न घेतल्यानं होता संताप
या सगळ्यात मागील चार दिवसांपासून शाळा प्रशासनाने आपली भूमिका न मांडल्यामुळे शाळेविरोधातही संताप व्यक्त होऊ लागला होता. त्यामुळेच आज (सोमवार, 19 ऑगस्ट) अखेर या शाळा प्रशासनाने निवेदन जारी करत आपली भूमिका मांडली आहे. तसंच बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुख्याध्यापिका निलंबित, पालकांची जाहीर माफी
शाळेने जारी केलेल्या निवेदनात सध्याचा काळ शिक्षण संस्थेसाठी नाजूक असून या चिमुकल्या मुलींसोबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचं शाळेनं म्हटलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शाळेचीच असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यासोबतच ज्या खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करत होता, त्या कंत्राटदार कंपनीचा करार रद्द करून काळा यादी टाकण्यात आलं असल्याचं शाळेनं स्पष्ट केलंय.
या प्रकरणात शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात ने आण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.
( नक्की वाचा : Kolkata Doctor Murder : 'तुमच्या बॉयफ्रेंडसोबत....', डॉक्टरांच्या आंदोलनावर बोलताना खासदाराची जीभ घसरली )
शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेने म्हटलं आहे. तर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पालक आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे.