बदलापूर प्रकरण- FIR व्हायरल केल्याचा आरोप, वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळकेंविरोधात तक्रार

ही कॉपी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळके या दोघांनी व्हायरल केल्याचे पुरावे देखील पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

निनाद करमरकर

बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची FIR कॉपी व्हायरल करणाऱ्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे केली आहे. ही कॉपी बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळके या दोघांनी व्हायरल केल्याचे पुरावे देखील पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे वामन म्हात्रे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे, PM रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. यानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या FIR ची कॉपी बदलापूरमधील काही व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल झाली होती. बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेचे महेंद्र शेळके यांनी ही कॉपी व्हायरल केल्याचे पुरावे पीडित मुलीच्या आईने दिले आहेत. बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित मुलगी किंवा तिच्या कुटुंबीयांची, शाळेची ओळख उघड करण्यास मनाई असते. मात्र या प्रकरणाची FIR ची कॉपी व्हायरल झाल्यामुळे पीडित मुलीची ओळख, तिचं नाव, पत्ता हे सगळं जगजाहीर झालं असून यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

हे ही वाचा : गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक हादरलं; लेकीला विष पाजून झोपवलं अन् कुटुंबाचाही शेवट!

FIR ची कॉपी व्हायरल झाल्यापासून बदलापूर शहरातील नागरिक, स्थानिक पत्रकार हे वारंवार रात्री बेरात्री मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी जात असून समाजातही याच मुलीसोबत हा प्रकार घडला आहे, हे उघड झाल्यामुळे मुलीच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार मुलीच्या आईने केली आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून गेली असून तिची ओळख सार्वजनिक झाल्यामुळे तिच्या भविष्यालाही धोका निर्माण झाला आहे. या सगळ्यामुळे आम्हाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे,  असं मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केलं आहे.

हे ही वाचा : प्रियकरासोबत आईने 'त्या' अवस्थेत पाहिलं; लेकीने जागेवरच जन्मदातीला संपवलं

मुळात इतक्या संवेदनशील प्रकरणाची FIR कॉपी राजकीय व्यक्तींना मिळतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करत ही कॉपी व्हायरल करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि महेंद्र शेळके या दोघांच्याही विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे. यामुळे वामन म्हात्रे अडचणीत येण्याची शक्यता आहे.