Bandra Encroachment : वांद्रे परिसरातील सर्वात मोठं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून वांद्रे पूर्वेकडील झोपडपट्टी हटविण्याचं काम सुरू आहे. गेल्या एक दशकांहून अधिक काळापासून ही झोपडपट्टी उभारण्यात आली आहे. पुढील काही दिवस हे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जागेवर उभी राहिलेली ही झोपडपट्टी चक्क चार ते पाच मजल्यांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. अखेर आरपीएफ आणि जीआरपीकडून एकत्रितपणे कारवाई करीत वांद्रे स्टेशन पश्चिमेकडील गरीबनगर भागातील झोपडपट्टी हटविण्याच काम सुरू आहे.
शेकडो अनधिकृत झोपड्या पाडल्या....
मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरातील गरीब नगरमध्ये रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेकडो अनाधिकृत झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या. सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणार नाही अशा ठिकाणी हे लोक अतिक्रमण करुन वर्षानुवर्षे राहत होती. याच परिसरात एवढ्या जागेवर घरांची किंमत काय असू शकते याचा कधी विचार केला आहे का?
घरांच्या किमती ऐकून धक्काच बसेल...
मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागून शेकडो झोपडपट्ट्या वर्षानुवर्षे उभ्या आहेत. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या अनाधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोजर चालवला जातोय. या अतिक्रमित भूखंडाचे क्षेत्रफळ आणि झोपड्यांची संख्या ही डोळे फिरवणारी आहे. २३०० चौरस मिटर म्हणजेच ५७ हजार चौरस फूट भुखंडावर या अनाधिकृत झोपडपट्ट्या उभ्या होत्या. पश्चिम रेल्वेच्या जागेवर असणारे हे सगळ्यात मोठे अतिक्रमण आहे. गरीबनगर झोपडपट्टीचा १.३ एकरचा परिसर एका मोकळ्या जागेप्रमाणे असता तर एफएसआय पकडून १००० ते १२०० कोटींचा प्रोजेक्ट झाला असता, असं वास्तुरचनाकार निखिल दीक्षित यांचं म्हणणं आहे.
गरीबनगरमध्ये १०० ते ४०० स्क्वेअर फुटांची घरं होती. येथे शेकडो कुटुंब फुकटात राहत होती. म्हाडासारख्या अल्पदरात घर देणाऱ्या आस्थापनेकडून जर येथे घराची उभारणी आणि विक्री केली असती, तर १०० स्क्वेअर फुटाच्या घराची किंमत २५ ते ३५ लाख आणि ४०० स्क्वेअर फुटाची किंमत १ कोटी ते दीड कोटींच्या घरात गेली असती. हा आकडा खूप मोठा आहे. मात्र जर एखाद्या खाजगी आस्थापनाने येथे इमारती बांधून घरांची विक्री केली असती तर याची किमत ६० लाख ते २ कोटी ४० लाखांच्या घरात गेली असती.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून येथील कुटुंब फुकटात इथं राहत होते. झोपडपट्टीत त्यांनी ४ ते ५ मजलेही चढवल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे येथे राहणाऱ्या अनेकांनी घरं भाड्यानेही दिली होती. ८० ते १०० स्क्वेअर फुटाच्या घराचं भाडं ८ ते १० हजारांच्या घरात असल्याचं काही जणांकडून सांगण्यात आलं आहे.
म्हाडासारख्या अल्पदरात घरांची उभारणी झाली असती तर... (२५,००० ते ३५,००० पर स्क्वेअर फूट)
१०० स्क्वेअर फूट - २५ ते ३५ लाख
४०० स्क्वेअर फूट - १ कोटी ते दीड कोटींच्या घरात
बड्या बिल्डरने घर बांधलं असतं तर...
(६०,००० हजार स्क्वेअर फूटने विक्री)
१०० स्क्वेअर फूट - ६० लाख
४०० स्क्वेअर फूट - २ कोटी ४० लाख
(मात्र ही जागा रेल्वेच्या मालकीची असल्याने येथे खासगी बांधकाम करता येणार नाही)
खरंतर मुंबईत सर्वच परिसरात मोठ्याप्रमाणात अनाधिकृत झोपडपट्ट्या आहेत. दिवसागणिक त्या वाढतच चालल्या आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वोट बँकेचे राजकारण हे एक प्रमुख कारण या मागे आहे. त्यामुळे जोपर्यंत यातून राजकीय हस्तक्षेप कमी होणार नाही, तोपर्यंत अनाधिकृत झोपड्या उभ्या राहणं थांबवू शकणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world