देवा राखुंडे, प्रतिनिधी
काळ्या काचांविरोधात बारामती पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहतूक शाखेने पंधरवड्यात या मोहिमेअंतर्गत तब्बल १५२ चारचाकी वाहनांवर कारवाई करत आतापर्यंत ९ लाख ७५ हजारांचा दंड वसूल केला आहे. याबद्दल बारामती पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. पण काळ्या काचांविरोधातील ही मोहीम तात्पुरती असणार की लॉंग टर्म असणार आणि राजकीय दबावाव्यतिरिक्त पोलीस ही कारवाई सक्षमपणे करणार का ? मग तो कोणत्याही पक्षाचा आणि कोणत्याही नेत्याचा बगलबच्चा असो पोलीस त्याच्यावर कायद्याच्या कचाट्यात कारवाई करतील की ही कारवाई केवळ सर्वसामान्य पुरतीच असेल.
गाडीला काळे फिल्मिंग करण्याबाबत शहरी भागातील वाहतूक शाखा असेल वा तालुकास्तरावरचे पोलीस ठाणे असेल, त्यांना दिलेल्या वर्षातील आकडा पूर्ण करणे बंधनकारक असते. गाड्यांना काळ्या काचा लावून फिरणारे ९० टक्के राजकीय नेत्यांचे, क्राईम करणारे कार्यकर्ते असतात. आता या काळ्या काचांविरोधात बारामती पोलिसांनी कंबर कसली आहे. एकाच पंधरवड्यात तब्बल 152 वाहनावर कारवाई करत पोलिसांनी नऊ लाख 75 हजार रुपयांचा आर्थिक दंड ही वसूल केला आहे.
पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. मात्र पोलिसांनी गाड्या पकडल्यानंतर नेत्यांकडून अशा गाड्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो. अशावेळी परंतु पोलिस गाडीचालक वा मालकाचा बोलण्याचा अंदाज घेत, पुढची कारवाई करतात ते बऱ्याच वेळा दिसून आलंय. मात्र बारामती पॉलिसीला अपवाद असल्याचं पोलिसांचा म्हणणं आहे.
काळ्या फिल्मिंगचा प्रामुख्याने वापर कसा होतो?
- या डार्क काळ्या फिल्मिंग केलेल्या गाड्यांचा वापर निवडणुकांच्या वेळी केला जातो.
- कधी कधी नेतेच अशा गाड्यांचा वापर करीत असतात
- अनेक सेलिब्रिटीही याचा वापर करतात. मात्र, त्यांना तो करावाच लागतो. आणि नाही केल्यास रस्त्यावर गर्दी होऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते. मात्र, हेही कायदाबाह्यच आहे.
- न्यायालयानेही अनेकदा गुन्ह्यात वापरलेल्या अशा गाड्यांच्या वर्णनावरून गंभीर प्रश्न ही उपस्थित केले आहेत.
- कारवाईमध्ये दंड आकारताना पोलिसांकडून केवळ दंड आकारला जातो, पण फिल्म काढून टाकली जात नाही.
कधी कधी पोलिस काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर सरसकट कारवाई करतात, मात्र न्यायालयाने दिलेल्या फिल्मबाबतच्या टक्केवारीकडे लक्ष दिले जात नाही. कारण, ती टक्केवारी सांभाळून केलेले फिल्मिंग देखील गाड्यांवरही दिसून येते. मुळात ही कारवाई करताना तपासणीसाठी आवश्यक असणार यंत्रच पोलिसांकडे नसतं. या सर्व गोष्टींमुळे सक्षमपणे कारवाई करण्यात अडचणी येतात. पोलीस कारवाई करत राहतात आणि कायद्याला पायदळी तुडवणारे पुन्हा पुन्हा अधिक आपल्या गाड्यांच्या काचा काळ्या करत काळे धंदे चालूच ठेवतात. आता बारामती पोलिसांनी हे काळे धंदे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी काळ्या काचानविरोधात कंबर कसली आहे. अर्थात ही मोहीम किती सक्षमपणे राबवली जाते आणि पोलीस खात्याला यात कितपत यश येतं हे येणारा काळच ठरवेल.