तो 25 वर्षांचा. तर ती अवघ्या 21 वर्षांची. एक महिन्यापूर्वी त्यांचे वाजतगाजत लग्न झाले.लग्नानंतर दोघांनी पुण्यात संसार थाटला. पण तिथेच माशी शिंकली. एक महिन्यातच दोघांचे पटत नव्हते. भांड्याला भांडं लागत होतं. त्यातून वाद वाढत गेले. एका महिन्यातच ही स्थिती उद्भवली. त्यातून मुलीने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीने असं काही तरी केलं ह समजल्यानंतर मुलाने ही कसलाही विचार न करता आपली जिवन यात्रा संपवली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय सर्व जण हादरून गेले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अक्षय गालफाडे आणि शुभांगी गालफाडे यांचे एक महिन्या पूर्वी लग्न झाले होते. दोघे ही सुखी संसाराची स्वप्न पाहात होते. बीडच्या केतुरा गावातलं हे जोडपं होतं. लग्न झाल्यानंतर हे दोघेही पुण्यात राहाण्यासाठी गेले. पण तिथे त्यांच्यात वाद झाले. कौटुंबिक वाद होत आहेत हे लक्षात आल्यानंतर ते दोघेही मुळ गावी म्हणजे केतुरा या गावात ते परत आले. पण गावी आल्यानंतर वाद काही थांबले नाहीत. वाद हे होतच राहीले. शेवटी शुभांगीने राहात्या घरीच बुधवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली.
शुभांगीला त्यानंतर तात्काळ उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु वाटेतच तीचा मुत्यू झाला. या घटनेनंतर शुभांगीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती अक्षय गालफाडे यांना रूग्णालयात धारेवर धरले. आता पोलीस केस होणार, सासरची मंडळी आपल्याला त्रास देणार यामुळे अक्षय पुर्ण पणे घाबरून गेला होता. आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर होता. लग्नाला एक महिना झाला नाही तर पत्नीने आत्महत्या केली यामुळे तो आधीच प्रचंड दबावात होता. अशा स्थितीत त्यानेही नको ते पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
पत्नी शुभांगीने बुधवारी आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी अक्षय गालफाडे यांनेही शेतातील लिंबाच्या झाडाला पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. एक महिन्या पूर्वी सुरू झालेला संसार एक महिन्यानंतर दोघांच्या ही आत्महत्येने संपला. या दुर्दैवी घटनेनं केतुरा गावासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. दोघांच्या ही मृत्यूने कुटुंबिय पुर्ण पणे खचून गेले आहेत. ऐवढ्या लहान वयात दोघांनीही टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वच जण हादरले आहेत.