
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले. पण या निमित्ताने राज्यातलं राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली. तर पुन्हा एकदा यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख एसंशिं असा केला. असा उल्लेख करणे एकनाथ शिंदे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्याला प्रत्युत्तर देत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख UT असा केला. शिवाय युटी म्हणजे युज अँड थ्रो असं ही शिंदे यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे या दोन गटातील वाकयुद्ध या निमित्ताने आणखी तिव्र होण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभेत सत्ताधारी नेते मुस्लिमांचा कळवळा आणत बोलत होते. संसदेत जिन्नांनाही लाजवेल अशी, मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषणं अमित शाहांसह मित्रपक्षांनी केली अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे की बाजूने? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हिंदुत्व सोडणारे कसे? असा सवाल ठाकरे यांनी करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाचीही कोंडी केली. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. उबाठा गट हा सध्या गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांना काय बोलायचं हे कळत नाही. काय करायचं हे सुचत नाही. धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय अशी अवस्था उबाठा नेतृत्वाची झाली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी 2019 साली खुर्चीसाठी जी चूक-अपराध केला, त्यापेक्षा मोठा अपराध कालचा होता. असं ही ते म्हणाले. देशभक्त मुस्लीमांना बाळासाहेब ठाकरे यांचाही पाठींबा होता. तिच भूमिका आमची आहे. दे देशा विरोधात आहेत त्यांना आमचा विरोध आहे असंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे उबाठाला जीनांची आठवण येते हे दुर्दैवी आहे असं ही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांना काही सुचत नाही. निर्णय घ्यायचा ही त्यांना समजत नाही. पत्रकार परिषद घेवून त्यांनी स्वताची आब्रू काढून घेतली आहे. वक्फचं बील आणल्या मुळे मुठभर लोकांच्या हातात जी जमीन होती त्याला चाप बसणार आहे. याचा मुस्लीम समाजातील मुलांना, महिलांना, फायदा होणार आहे असा दावा शिंदे यांनी केला. शिवाय याचे स्वागत मुस्लीम समाजानेही केले आहे असंही ते म्हणाले.
दरम्यान तुमचा उल्लेख उद्धव ठाकरे हे एसंशिं असा करतात. त्यावर त्याचा अर्थ काय अशी विचारणा त्यांनी केली. एसंशिं म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे असं त्यांना सांगण्यात आलं. यावर शिंदे यांचा राग अनावर झाला. मला एसंशिं म्हणतात मग त्यांचं नाव UT आहे. मग मी त्यांना युज अँड थ्रो असं म्हणू का? त्यांची तशी निती आहे. वापरा आणि फेका हेच त्यांचे काम आहे. असं म्हणत मला बोलायला लावू नका, माझ्याकडे भरपूर काही आहे, असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला. तुम्ही मला गद्दार आणि खोके म्हणून हिणवलं, तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने खोक्यात बंद करून टाकलं असं ही शिंदे यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Video : 'मराठीत उद्घोषणा का नाही?' देसाई बाईंनी भररस्त्यात वाहतूक पोलिसाला झापलं!
दरम्यान उद्धव ठाकरे हे औवेसींची भाषा बोलत आहेत. त्यांची बोली ही समान आहे. जे नेतृत्व गोंधळलेले असेल तो पक्ष संपुष्टात येतो हे इतिहास सांगतो. तिच स्थिती उबाठाची झाली आहे असं ही ते म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेवून जातोय. विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. त्यांच्या 100 जागा लढून 20 जागा जिंकता आल्या. त्या ही आमच्या काही चुकांमुळे जिंकल्या गेल्या असंही शिंदे यांनी सांगितलं. शिवाय खरी शिवसेना कुणाची हे विधानसभेत लोकांनी दाखवून दिलं आहे असं ही ते परत एकदा म्हणाले. गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा फैसला जनतेने केला आहे असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world