आकाश सावंत, बीड: खून, मारामाऱ्यांच्या घटनांनी बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. बीडमध्ये क्षुल्लक कारणांवरुन जीवघेणे हल्ल्याच्या, टोळक्यांकडून मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना बीडच्या गेवराईमध्ये घडली आहे. बीडमध्ये जमिनीच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या गेवराई तालुक्यातील बगेवाडी येथे तुम्ही गायरान जमीन वहीती करायची नाही असे म्हणत चार जणांनी तिघांना मारहाण केली. यामध्ये एका महिलेच्या हाताला जबर मार लागला असून इतर तिघांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. यातील जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.