स्वानंद पाटील, बीड: पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्यात संभाषण वाढले. याच संधीचा लाभ घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगुन त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला.
यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येवून स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर सांगितले आहे. मात्र दुपारी १ वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासा संदर्भात सुचना केल्या. दरम्यान, याप्रकरणी आरोपी उद्धव गडकर याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.