बीड आहे की बिहार अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. संतोष देशमुख अपहरण आणि हत्येनंतर तर बीडची प्रतिमा आणखी डागळली होती. हे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. एका माजी सरपंचाचं अपहरण करण्यात आलं. हे अपहरण पोलिस स्थानकाच्या समोरून करण्यात आलं. गाडीही पोलिस स्थानकातूनच बाहेर आली. अधिक धक्कादायक म्हणजे हे अपहरण करताना मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव सांगण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार घडला आहे ज्ञानेश्वर इंगळे याच्या बरोबर. अंगावर काटा आणणारा थरार त्यांनीच सांगत थेट बीडचे पोलिस अधिक्षक कार्यालय गाठत तक्रार दाखल केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्ञानेश्वर इंगळे हे बीड जिल्ह्यातील केजचे रहीवाशी आहेत. ते माजी सरपंचही आहेत. ते दत्ता तांदळे या व्यक्ती बरोबर मसाल्याचा व्यवसाय करतात. आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून 20 लाख रुपये मिळवायचे आहे. त्यासाठी मुंबईला जायचं आहे. येताना बरोबर दोन लाख रुपये घेवून ये असं इंगळे यांना सांगण्यात आलं. त्यानुसार ते पैसे घेवून केजला पोहोचले. केज पोलिस स्थानकातून एक गाडी बाहेर आली. त्या गाडीत त्यांना टाकण्यात आलं. ही गाडी पाटोद्याच्या दिशेने निघाली.
या गाडीच त्यांचा पार्टनर दत्ता तांदळे ही होता. पुढे गेल्यावर ज्ञानेश्वर इंगळे यांचा वाटेतच दोरीने गळा आवळण्यात आला. पुढे एक बंद बंगला होता. तिथे त्यांना डांबण्यात आलं. त्यांचे हाताला दोरखंड बांधण्यात आला. तर पायाला कुलूप लावण्यात आलं. आणखी पैशांची व्यवस्था कर असं सांगण्यात आलं. नंतर तुझं काय करायचं ते बघू असं धमकावण्यात आलं. त्यांच्याकडून 2 लाख 57 हजार काढून घेण्यात आले. शिवाय त्यांचा मोबाईलही त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर अपहरण करणारे तिथून निघून गेले.
सर्व जण गेल्यानंतर ज्ञानेश्वर इंगळे यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. त्यानंतर ते थेट बीडला गेले. तिथं ते पोलिस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार करणार आहे. पोलिसांची या अपहरणात मिलीभगत आहे. त्यामुळे केजला तक्रार देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या लोकांना आपला जीवच घ्यायचा होता पण नशिबाने आपण वाचलो असंही ते म्हणाले. आपल्याला लुटण्याच्या उद्देशाने हा सर्व कट रचला गेला होता असा आरोपही त्यांनी यावेळी केला.